साऊथचा "थलैवा' धारावीत प्रकटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

धारावी : सुपरस्टार रजनीकांत आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मंगळवारी धारावीत आला होता. आपल्या आवडत्या नायकाला बघण्यासाठी धारावीतील तरुण, महिला, आबालवृद्धांनी चित्रीकरणाच्या ठिकाणी गर्दी केली होती. यामुळे या परिसराला जत्रेचे रूप आले होते. 

धारावी क्रॉस रस्त्यावरील पालवाडी येथील शिवनारायण बावडी येथे रजनीकांतच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. रजनीकांत धारावीत आल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण धारावीत पसरली. त्यामुळे पालवाडी येथे रजनीकांतच्या चाहत्यांनी धाव घेतली. चित्रीकरणाच्या ठिकाणी गर्दी झाल्याने स्थानिकांची मोठी अडचण झाली होती. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यातच चित्रीकरण स्थळी काही तरुण नागरिकांसोबत दादागिरी करत होते. चित्रीकरण स्थळी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही हे तरुण धक्काबुक्की करीत होते. यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी निषेध नोंदवून चित्रिकरण स्थळावरून काढता पाय घेतला. 

सुरक्षेसाठी चित्रीकरणाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. रजनीकांत धारावीत चित्रीकरणासाठी येतो आणि आम्हाला पाहता येत नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.