मालिका अभिनयाचा 'आरंभ' 

चिन्मयी खरे
गुरुवार, 1 जून 2017

स्टार प्लसवर लवकरच सुरू होत असणाऱ्या "आरंभ' या मालिकेच्या निमित्ताने या मालिकेत वरुणदेव या भूमिकेत असणारा रजनीश दुग्गल याच्याशी रंगलेल्या मनमोकळ्या गप्पा - 

स्टार प्लसवर लवकरच सुरू होत असणाऱ्या "आरंभ' या मालिकेच्या निमित्ताने या मालिकेत वरुणदेव या भूमिकेत असणारा रजनीश दुग्गल याच्याशी रंगलेल्या मनमोकळ्या गप्पा - 

"19 20' या चित्रपटातील अभिनेता अशी ओळख असणारा द रेमण्ड मॅन रजनीश दुग्गल त्याच्या पहिल्या "आरंभ' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करतोय. त्याच्या या मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्ताने आमची भेट अहमदाबादमध्ये झाली. हॉटेलच्या लॉबीमध्ये बसलेलो असताना त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली. त्याला मालिकेबद्दल आणि त्याच्या या मालिकेतील व्यक्तिरेखेबद्दल विचारले तेव्हा त्याने अगदी उत्साहाने मालिकेबद्दल सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, "याआधी "फिअर फॅक्‍टर' हा स्टंट शो मी केला होता. या दोन शोमध्ये सारखेपणा म्हणजे त्या शोमध्येही स्टंट्‌स होते आणि या मालिकेतही स्टंट्‌स आहेत. यासाठी मी खास मार्शल आर्टस्‌, तलवारबाजी, घोडेस्वारी हे सगळं शिकतोय. "मी जेव्हा तलवारबाजी शिकत होतो तेव्हा मी एका डमीबरोबर सराव करत असे आणि माझी तलवारही हलकी असायची. पण जेव्हा मी चित्रीकरणासाठी तलवार हातात घेतली तेव्हा ती खूपच जड होती. त्यांनी मला साधारण 8 ते 10 किलोची तलवार दिली होती. मी विचारलं, यापेक्षा हलकी तलवार मिळणार नाही का? तेव्हा ते म्हणाले की, हीच सगळ्यात हलकी तलवार आहे. मी जी तलवार घेऊन या मालिकेसाठी चित्रीकरण करतोय ती खरी तलवार आहे.' घोडेस्वारी करताना तो घोड्यावरून पडला तर नाही ना, असे विचारले त्यावर तो हसून म्हणाला, "अजून तरी नाही. पण एक धक्कादायक अनुभव मात्र आलाय. एकदा घोड्याला लगाम देऊन त्याला दोन पायावर उभं करायचं होतं. त्यांनी मला सांगितलं की जर तू पडतोयस असं वाटलं तर घोड्याच्या मानेला धर. मी प्राणिप्रेमी असल्याने पहिल्यांदा अतिशय हळू लगाम दिला होता. पण तेव्हा दिग्दर्शक म्हणाले की, जरा जोरात लगाम दे आणि मीही तसे केले. आणि अचानक घोडा उधळला आणि माझा तोल गेला. माझ्या एका हातात तलवार होती. त्याच हाताने मी त्याच्या मानेला पकडायला गेलो. नशीब माझं की ती तलवार त्या घोड्याला लागली नाही. या मालिकेसाठी मी गेले सहा-सात महिने कसून मेहनत करतोय.' 
रजनीशने या मालिकेचे 15 पेक्षा जास्त भाग आत्तापर्यंत चित्रीत केले आहेत. रजनीश यात आर्य योद्‌ध्याची भूमिका करतोय. आर्य समाज हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थिरस्थावर होण्यासाठी प्रवास करत आहे. ते त्यांच्या हक्काच्या जमिनीच्या शोधात आहेत. त्यामुळे या भूमिकेसाठी देहबोलीसुद्धा तशीच असणे महत्त्वाचे होते. त्यामुळे रजनीशने ती देहबोली अंगिकारण्यासाठी चमच्याने जेवणे बंद केले. तो आता हातानेच जेवतो. 

सप्तसिंधू नदीचे पात्र हे सर्वपरीने समृद्ध आहे. पण त्या जमिनीवर आधीच द्रविड समाजाची सत्ता आहे. ही जमीन मिळवण्यासाठी आर्य आणि द्रविड यांच्यात पुढे कसा संघर्ष होते हे दाखवणारी ही मालिका आहे. ही मालिका ऐतिहासिक आहे तर तू आर्य आणि द्रविड यांच्याबद्दल काही वाचलेस का? हे विचारल्यावर रजनीशने लगेचच उत्तर दिले, "मला इतिहास आणि भूगोल यांचा अभ्यास करायला खूपच आवडतो. त्यामुळे मालिकेत काम करायचं ठरलं तेव्हाच मी या सगळ्यावर वाचयला सुरुवात केली. माझे अर्धेअधिक वाचून झाल्यावर मला निर्मात्यांनी एक दिवस बोलावले आणि विचारले की, तू आर्य आणि द्रविड यांच्यावर काही अभ्यास केला आहेस का? मी म्हटलं हो. तर त्यांनी मला उलटेच सांगितले. ते म्हणाले, अभ्यास केला असशील तर सगळे विसरून जा. कारण ही सगळी काल्पनिक कथा आहे. त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही. मी हे एकून चकितच झालो.' "आरंभ' या मालिकेची कथा "बाहुबली' चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. ही मालिका स्वीकारायच्या आधी रजनीशने सगळे थरारपट केले आहेत. त्यामुळे चित्रपटातून मालिकेकडे वळावेसे का वाटले, असे विचारल्यावर तो बोलला, "मला खरं तर या मालिकेची कथा खूप आवडली. माझ्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. चित्रपट आणि मालिकेचा प्रेक्षक खूप वेगळा असतो. मालिका घराघरांपर्यंत पोहोचते. पण चित्रपट काही जणांपर्यंतच पोहोचतो. त्यामुळे मालिकेकडे वळावेसे वाटले. माझी कोस्टार कार्तिका नायर हीसुद्धा चित्रपट अभिनेत्री आहे. त्यामुळे आमच्या दोघांसाठी हा पहिलाच अनुभव आहे.' 
त्याच्या भूमिकेविषयी त्याला विचारले तर त्याने तो एकदम सरळमार्गी असणारा योद्धा आहे, असे म्हणाला. त्यामध्ये जबरदस्त ऍक्‍शन, निर्भीडपणा पाहायला मिळणार आहे. ही मालिका बाहुबलीच्या लेखकाने लिहिली म्हटल्यावर माझा साहजिक प्रश्‍न होता की, बाहुबली आणि वरुणदेव यांच्या भूमिकेत काय साम्य आहे आणि तुला बाहुबलीचे कोणते गुण घ्यावेसे वाटतात. यावर तो उत्साहाने म्हणाला, "बाहुबली मला खूप आवडला होता. मी दोन वेळा हा चित्रपट पाहिलाय. मी म्हणेन, साम्य नक्कीच आहे. वरुणदेव त्याच्या वडिलांच्या सन्मानासाठी लढतोय; तसेच बाहुबलीनेही त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतलाय. दोघेही खूप सकारात्मक आहेत. आपल्या प्रजेसाठी काहीही करण्यास तयार आहेत. अशी अनेक साम्यस्थळे आहेत. ते तुम्हाला मालिका पाहताना कळेलच.' असा प्रयोग आजपर्यंत मालिकेमध्ये झालेला नाही, असे त्याने सांगितले. रजनीश आता छोट्या पडद्यावरचा वरुणदेव म्हणून स्वत:ची नवी ओळख कशी निर्माण करतोय हे पाहण्याची उत्सुकता आहे!