ARAI टेकडी आणि 21 किलोमीटर धाव..!

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

स्वतःचा वाढदिवस नेहमी ‘हटके’ पद्धतीनं साजरा करणाऱ्या सिने-अभिनेता रमेश परदेशी याने याही वर्षी ९ जूनला आपला वाढदिवस सालाबाद प्रमाणे अनोख्या पद्धतीनं साजरा केला. गेल्या वर्षी आपल्या ४० व्या वाढदिवसानिमित्त कोथरूडच्या ARAI टेकडीवर विविध प्रकारची ४० झाडे त्यानं रुजवली होती.  त्यामुळे आता याही वर्षी रमेश आपला वाढदिवस कोणत्या पद्धतीनं साजरा करतो याची उत्सुकता त्याच्या मित्र परिवाराला लागून राहिली होती !

पुणे : स्वतःचा वाढदिवस नेहमी ‘हटके’ पद्धतीनं साजरा करणाऱ्या सिने-अभिनेता रमेश परदेशी याने याही वर्षी ९ जूनला आपला वाढदिवस सालाबाद प्रमाणे अनोख्या पद्धतीनं साजरा केला. गेल्या वर्षी आपल्या ४० व्या वाढदिवसानिमित्त कोथरूडच्या ARAI टेकडीवर विविध प्रकारची ४० झाडे त्यानं रुजवली होती.  त्यामुळे आता याही वर्षी रमेश आपला वाढदिवस कोणत्या पद्धतीनं साजरा करतो याची उत्सुकता त्याच्या मित्र परिवाराला लागून राहिली होती !
 
रमेशचा म्हणजे पिटयाचा लहानपणापासूनचा मित्र म्हणजे प्रविण तरडे. कॉलेजमध्ये असतांना दोघांनी आपला अभिनय क्षेत्रातील प्रवास एकमेकांचा हात धरूनच सुरु केला होता ! कॉलेज मध्ये असतांना प्रवीणनं आणि त्यानं मिळून 'उद्गार पुणे'  ही नाट्य संस्था स्थापन केली  आणि त्या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी वेगवेगळ्या प्रायोगिक  एकांकिका आणि नाटके केली. पुढे मालिका करता करता, रेगे आणि देऊळबंद सारखे मराठी चित्रपट त्यानं केले. त्याची ही झेप मराठी पुरतीच मर्यादित न राहता अजय देवगण बरोबर  ‘दृष्यम’ ह्या हिंदी चित्रपटात देखील त्यानं काम केलं आणि आता मराठीतील एका मोठ्या आगामी चित्रपटात तो त्याच्या दमदार अभिनयाने आपल्याला भेटणार आहे.

प्रवीणनं लिहिलेल्या या नवीन चित्रपटात रमेशची खूपच उल्लेखनीय भूमिका असणार आहे. या भूमिकेला धावण्याच्या कौशल्याची गरज असून चित्रपटात ते धावणं ‘ऑथेंटिक’ वाटावं म्हणून गेले काही महिने रमेश त्याच टेकडीवर रोज धावण्याचा सराव देखील करत आहे ! तशीही ‘फिटनेस’ची त्याला पहिल्यापासूनच आवड होती ! पुरेसा सराव झाल्यानंतर त्यानं ठरवलं या वर्षीचा आपला वाढदिवस धावूनच साजरा करायचा ! त्यामुळे त्यानं यंदाचा आपला ४१ वा वाढदिवस तब्बल २१ किलोमीटर सलग धावून साजरा केला !