"रेडू' चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट 

redu
redu

शशांक शेंडे सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर पूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 

मुंबई - 55 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "रेडू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. "मुरांबा', "क्षितिज - एक होरायझन' या चित्रपटांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. "रेडू' या चित्रपटासाठी शशांक शेंडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर "भेटली तू पुन्हा' या चित्रपटासाठी पूजा सावंत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून "मंत्र' आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा पुरस्कार "इडक' या चित्रपटाला देण्यात आला. 

राज्य पुरस्कार सोहळा वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्‍लब ऑफ इंडिया येथे झाला. पुरस्कार सोहळ्याला मराठी-हिंदीतील तारे-तारकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार धर्मेंद्र यांना अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पंजाबपुत्राला महाराष्ट्राच्या मातेने आपलेसे केले, अशा शब्दांत धर्मेंद्र यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना गौरवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते देण्यात आला, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना संगीतकार अजय-अतुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

ऑस्करच्या ज्युरीसाठी निवड झालेल्या उज्ज्वल निरगुडकर आणि अनंत पटवर्धन या दोन महाराष्ट्राच्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन डॉ. जब्बार पटेल आणि मनोज जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

सर्वप्रथम राज्य सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्राने 60 वर्षे माझ्यावर अविरत प्रेम केले. 1962 मध्ये मुंबईत आलो. गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला या मातीने खूप काही दिले. या भूमीला मी नेहमीच आई मानले आहे. या पंजाबपुत्राला या महाराष्ट्राच्या आईने आपलेसे केले. तिचा मी खूप आभारी आहे. तुमच्या प्रेमानेच आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते. 
- धर्मेंद्र, ज्येष्ठ अभिनेते 

मला हा पुरस्कार दिल्याबद्दल माझ्यावर भरभरून प्रेम करणारे रसिक प्रेक्षक आणि राज्य सरकारचे आभार मानते. ज्या चित्रपट महर्षींच्या नावाने हा पुरस्कार मिळाला, त्याचा खूप आनंद आहे. हा पुरस्कार पडद्यामागे आणि पुढे काम करणाऱ्या महिलांना समर्पित करते. 
- मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका 

राज्य सरकारचे आभार मानतो. हा पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफच्या हस्ते मिळाला यासाठी आनंदी आहे. मी धर्मेंद्र यांचा फॅन आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मला त्यांच्यासोबत थोडा वेळ व्यतीत करता आला. 
- राजकुमार हिराणी, दिग्दर्शक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com