बॉलिवूडमध्ये मिळाली "एंट्री' 

शब्दांकन :अरुण सुर्वे
शुक्रवार, 5 मे 2017

छोट्या पडद्यावरील अभिनय पाहून मला काही महिन्यांतच बॉलिवूडमध्ये अभिनयाची संधी मिळाली. सध्या "तू सूरज मैं सांझ पियाजी' या मालिकेत मी कनकची भूमिका साकारत असून, ती मला आपलीशी वाटते. 
- रिहा शर्मा, अभिनेत्री 

आम्ही मूळचे राजस्थानचे असलो, तरी आता मुंबईकरच झालो आहे. माझं बालपण मुंबईतच गेलं. सेंट झेवियर्स स्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईतच झालं. मला अभिनयाची आवड लहानपणापासूनच आहे. त्यामुळं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न मी पाहिलं अन्‌ ते सत्यातही उतरलं. अभिनय आणि झगमगाटी दुनियेची मला पहिल्यापासूनच आवड आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम माझ्या अभिनयावर झाला. शालेय शिक्षण घेत असताना मी नाटकं व विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. 

मला छोट्या पडद्यावर पहिला ब्रेक "इतना करो ना मुझे प्यार' या मालिकेच्या माध्यमातून मिळाला. त्यात मी पल्लवी कुलकर्णी आणि रोनित रॉय यांच्यासोबत अभिनय केला. निशी खन्ना हे माझ्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. या मालिकेनंतर मी "अधुरी कहानी हमारी' आणि सध्या "तू सूरज मैं सांझ पियाजी'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. छोट्या पडद्यावर अभिनय करत असतानाच मला बॉलिवूडमध्येही अभिनय करण्याची संधी मिळाली. "एम. एस. धोनी' चित्रपटात मी भूमिका साकारली आहे. 

"तू सूरज मैं सांझ पियाजी'मध्ये मी कनकची व्यक्तिरेखा साकारत असून, ती मला अगदी आपलीशी वाटते. कनक राठी आधुनिक असली, तरी आपल्या मुळाशी जोडलेली, बिनधास्त, स्वतंत्र तरीही वचनबद्ध अशी मुलगी असून, ती आपल्या परिवारालाच प्राधान्य देते. तिच्यामधून तिच्या आई-वडिलांची झलक दिसते. ती आपल्या वडिलांसारख्याच छान जिलब्या बनवते आणि आपल्या आईप्रमाणे आपल्याला काय हवे आहे, हे तिला माहीत असते. कनकची आपली अशी खासियत असून, प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल. तिच्या नशिबात उमाशंकर असून, त्याचा रूढीपरंपरांवर विश्‍वास असतो. आपल्या जोडीदाराला अनुरूप नसताना त्याच्यासाठी सुयोग्य बनण्यासाठी स्वतःला बदलणे, असाच कनकचा प्रवास असेल. 

भावी वाटचालीबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही. मी वर्तमानकाळालाच प्राधान्य देते; मात्र जे काही होतं ते चांगल्यासाठीच, यावर माझा विश्‍वास आहे. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला, तोच माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. छोट्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर त्यातील भूमिका पाहून मला काही महिन्यांतच बॉलिवूडमध्ये अभिनयाची संधी मिळाली, हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. आगामी काळातही मला विविधांगी भूमिका साकारायच्या असून, बॉलिवूडमध्येही अभिनय करायचा आहे. 

 

Web Title: reecha sharma turning point interview