वावराचा विचार मांडणारा दिग्दर्शक कुठूनही येऊ शकतो : सचिन खेडेकर  

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 24 सप्टेंबर 2017

आजचा चित्रपट हा आता मुंबई - पुण्यातील लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही. कथा असलेला व आपल्या वावराचा विचार मांडणारा दिग्दर्शक कुठूनही येऊ शकतो, असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला आहे. 

दौंड  : आजचा चित्रपट हा आता मुंबई - पुण्यातील लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही. कथा असलेला व आपल्या वावराचा विचार मांडणारा दिग्दर्शक कुठूनही येऊ शकतो, असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला आहे. 

दौंड शहरात जागर या शारदीय ज्ञानरंजन महोत्सवात सचिन खेडेकर यांनी हा विश्वास व्यक्त केला. आमदार राहुल कुल, डॅा. लक्ष्मण बिडवे, डॅा. रंगनाथ कुलकर्णी, डॅा. राजेश दाते, विक्रम कटारिया, आदी या वेळी उपस्थित होते. राज काझी यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधला. 

सचिन खेडेकर म्हणाले,  ``  तरूणांचा सहभाग वाढत आहे. दरवर्षी शंभर मराठी चित्रपट निर्माण होत असून त्यापैकी एेंशी टक्के चित्रपट तरूणांच्या हातात आहे. आजचा काळ सोशल मिडियाचा आहे आणि घरातील सर्व जण मोबाईलवर असल्याने त्यांच्यात संभाषण नसल्याची मागच्या पिढीची खंत आहे. परंतु आज जो नवीन चित्रपट निर्माण होईल तो संभाषणावर मार्ग काढेल. आजच्या पिढीच्या ज्या विवंचना व समस्या आहेत त्या नाट्य - चित्रपट क्षेत्रातील  तरूण पिढीला जवळून कळल्या आहेत. तरूण पिढीचे लेखन आणि मांडणी हा महत्वाचा ठेवा असून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. `` 
ते पुढे म्हणाले, `` जीवनात उभं राहताना कोणत्याही व्यावसायिक माणसाचे प्रयत्न आणि प्रवास हे महत्वाचे असतात. प्रत्येकाला माझा प्रवास माझा खूप महत्वाचा होता, असे वाटते आणि अभिनय क्षेत्रात त्याला ` संघर्ष ` हे गोंडस नाव दिले गेले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी सोडून अभिनय करताना आलेल्या अपयशामुळे मी निराश झालो नाही. अपयशासाठी नशिबाला दोष दिला नाही तर आपल्याकडून कामात कसूर होत आहे किंवा कमी पडत आहे याचा विचार करून सराव वाढविण्यासह अभ्यास करून बदल केला. `` 

चौकट :- पौराणिक सिनेमा किंवा तमाशापट करायला आवडेल...

संत किंवा संत महिमा आणि मराठीत पौराणिक सिनेमा करावयाचा आहे. हिंदीतून वेब सिरीज आणि आजच्या काळातला तमाशापट करायला आवडेल, अशी इच्छा सचिने खेडेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल व्यक्त केली.