नोटाबंदीनं झालं झिंग झिंग झिंगाट!

note ban
note ban

नोटबंदीचा धागा पकडत 'सकाळ'च्या वाचकांनी केलेल्या विडंबनपर कविता...

"झालं झिंग झिंग झिंगाट"
हे उरात होतंय धडधड बॅंक बंद आता झाली 
पोत्यात भरलंय घबाड ही कशाची बाधा झाली 
आता अधीर झालोया, मग बधिर झालोया 
ब्लॅक मनी व्हाइट कराया बॅंकेत आलोया 
आरं बुडलोय लाखात, लोळतोय राखत 
अंगात आलंया... 
झालं झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट... 

आता उतावीळ झालो, घबाड उकरून काढलं 
तुझ्या नावावर काही रक्कम चेक्कानं धाडलं 
पोती भरून आलोया, लई दुरून आलोया 
फाडून गादी कोऱ्या नोटा घेऊन आलोया 
समद्या पोरात म्या लई घोरात 
अंगात आलंया... 
झालं झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट... 

समद्या गावाला झालीया माझ्या अटकेची घाई 
कुणी घेणार हो माझ्या या नोटा थोड्या काही 
आता सर्जिकल आलंया, म्हणून वॉन्टेड झालोया 
चौकीवरून पोलिसांना कलटी मारून आलोया 
झालं झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट... 
- सचिन बेंडभर, पिंपळे जगताप (ता. शिरूर) 
...
"देशाची तिजोरी"
(मूळ गाणे - देहाची तिजोरी...) 
देशाची तिजोरी, संपत्तीचा ठेवा 
लाव दार देवा आता, लाव दार देवा... 

खाते लोणी बोटे पुसुनि जात खादाडांची 
म्हणे थोर त्यांना का रे भीती कायद्याची 
लांबलेल्या हातांनाही, कंप हा सुटावा 
लाव दार देवा आता, लाव दार देवा... 

समाजात दावी पुण्य, अंतरात पाप 
ज्याचे त्याचे हाती आहे धन हे अमाप 
जनसामान्यांची कैसी, बुडे लोकसेवा 
लाव दार देवा आता, लाव दार देवा... 

"अर्थ' जणू मनातला किडा हा विखारी 
आपुल्याच प्रतिमेला सदा तो पोखरी 
घडोघडी बदनामीचा, ढोल वाजवावा 
लाव दार देवा आता, लाव दार देवा... 

तुझ्या कृपे पांडुरंगा, मुजोरी सुटावी 
मुक्तपणे नीतिमत्ता, मनात दाटावी 
मार्ग त्यांच्या उत्पन्नाचा, जना आकळावा 
लाव दार देवा आता, लाव दार देवा... 

भलेपणासाठी त्याच्या, बुरेपणा केला 
या धनात लोळुनि गेंडा, तरी मत्त झाला 
आपल्याच दृष्कृत्यांचा, चाखील का मेवा 
लाव दार देवा आता, लाव दार देवा... 
- एम. एस. पाटील, राजगुरुनगर (ता. खेड) 
...
"रोडपती"
एका रात्रीत अशी काय जादू झाली? 
कोट्यवधींची कशी ही रद्दी झाली 
किती त्यासाठी केला भ्रष्टाचार 
किती वेळा धाब्यावर टांगला शिष्टाचार 

पाचशे- हजारांच्या नोटांची भरून आहेत पोती 
त्यासाठी वाढविली कितीतरी नातीगोती 
निवडणुकाही आहेत आता तोंडावरती 
साऱ्या पैशांची होणार आता माती 

काळा पैसा जरी पांढरा केला 
त्यावरती आहे इन्कमटॅक्‍सवाल्यांचा डोळा 
पन्नास दिवसात कोट्यवधींचे काय करू? 
काळजात धडकी आता लागलीये भरू 

पन्नास रात्री आता झोप नाही लागणार मला, 
गेटवरचा वॉचमन माझ्यापेक्षा खरोखरच भला 
बंगल्याची माझ्या राखण करता- करता झोपतो 
मी मात्र रात्र- रात्र झोपेसाठी तरसतो 

खरंच काळी माया ही जमविता जमविता 
देशाचीच केली लूट मी आता 
तासांत मात्र जादू झाली 
सारी मायाच मातीमोल झाली 

साधू- संत सांगून गेले खरे 
पोटापुरतेच कमविलेले बरे 
धास्ती नाही अन्‌ भीतीही नाही 
कारण फुकटाचे कुणाचे घेतलेलेच नाही 

खरंच देशविकासासाठी कटिबद्ध मी राहणार 
काळी माया आता नाहीच जमविणार 
हेच व्रत आता मी स्वीकारणार 
'आदर्श नागरिक' मी भारताचा होणार 
- सुनील बनकर, डिंगोरे (ता. जुन्नर) 
...
"पाचशे म्हणाली हजाराला"
'लालीबाई' आज लईच गं बवाल झाली, 
गुपचूप आपला गेम केला, खरंच यांची कमाल झाली!

एका टायमाच्या राण्या आपण, मी धाकली तू थोर, 
पळत होता जो तो मागे, अट्टल पोलिस असो की चोर!

तेही काय दिवस होते, आपलीसुद्धा वट होती, 
शिपायापासून डॉक्टरपर्यंत आपल्याच नावाची 'कट' होती!

खबर लागल्यापासून आज त्यांना नकोशा गं झालोय, 
साला 'जगच हे मतलबी' या सत्यापर्यंत आलोय! 

लक्ष्मीपूजनाला यापुढे गं हळद कुंकू लावणार नाही, 
रस्त्यावरचा भिकारीही दोघींना ओळख साधी दावणार नाही!

माणसांचं प्रेम बघितलं, भूक बघितली नि हाव, 
उद्या परवा असू कुठे ते कोणास ठाव? 

नव्या राण्या येतील त्यांना एकच सांगणं करू, 
इथून तिथून फिरत राहा, पोत्यात नका पडू
इथून तिथून फिरत राहा, पोत्यात नका पडू!
- सागर आंगणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com