मी शाहरूखला जिमनॅस्टिक शिकवलं, पण तो विसरला

अरुण मलाणी
सोमवार, 24 एप्रिल 2017

सर्कशीवर वाईट दिवस

ळ दुपारी बाराची. स्थळ मुंबईनाका परिसरातील ग्रेट रॉयल सर्कसमधील कलाकारांचा तंबू. सर्कशीचा खेळ दुपारी दोनला सुरू होणार म्हणून कलाकार टीव्ही पाहत बसलेले. अन्‌ योगायोगाने टीव्हीवर 'ओ माय गॉड' चित्रपट सुरू. मंदिर, मशीद, चर्चमध्ये जाऊन लोक दान करणार, पण थोडे पैसे खर्च करून गरजूला मदत न करण्याच्या प्रवृत्तीचे दृष्य पाहून कलाकारांनाही हसू आवरले नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या या कलावंतांची कला पाहण्यासाठी दोन पैसे प्रेक्षकांना जास्त वाटत असल्यानेच कदाचित सर्कशीवर वाईट दिवस आल्याचा मनोमन विचार कलावंतांना आला.

नाशिक : 'मी मोठा हिरो होणार, मग तुम्हाला, या सर्कसला वर आणण्यासाठी प्रयत्न करणार' असे तो तेव्हा म्हणायचा... असं म्हणत मोठा झाल्यावर मात्र त्याला स्वतःच्याच शब्दांचा विसर पडला. पण, शाहरूखसोबतचा फोटो त्यांनी आजही जपून ठेवलाय. ही खंत आहे शाहरूखच्या 'सर्कस' या मालिकेत त्याला ज्यांनी प्रशिक्षण दिले त्या श्रीनिवास यांची.

मूळचे केरळातील असलेले श्रीनिवास सर्कशीतील कलावंतांना जिमनॅस्टिकचे प्रशिक्षण देतात. वडील सर्कशीतच कामाला असल्याने जेव्हापासून कळायला लागले त्या वयापासून श्रीनिवास सर्कशीतच लहानाचे मोठे झाले. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान हा देखील त्यांचा विद्यार्थीच.

सध्या नाशिकमध्ये ग्रेट लॉयल सर्कस भरली असून रोजच्या खेळांना प्रेक्षक जमविणे आयोजकांना मुश्‍कील झाले आहे. एखाद्या छोट्या पाड्या लोकसंख्येऐवढ्या या सर्कशीतील कलावंतांना रोजीरोटीसाठी संघर्ष करावा लागतोय. या कलावंतांकडून जीवन जगण्याची सुरू असलेली सर्कस सामान्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. जिमनॅस्टीक्‍स करणारा उत्तम दास बंगालचा, सर्कशीतील जोकर रंजीत सदा अन्‌ उपेंद्रकुमार जाधव हे बिहारचे. कुणी नेपाळचा तर कुणी उडिसाचा. अशा विविधतेतून एकतेचे दर्शन या सर्कशीतूनच घडते. एक कुटुंबाप्रमाणे राहत सुख:दुखात एकमेकांना साथ देत रॉयल सर्कस खडतर असा प्रवास करत आहे.

पन्नास वर्षांहून अधिक काळापासून सर्कशीत प्रशिक्षक म्हणून काम पाहणारे श्रीनिवास यांनी देश-विदेशातील सर्कशींमध्ये सहभाग नोंदविलाय. मलेशिया, सिंगापूर सारख्या ठिकाणी लोक कलावंतांच्या छोट्या-छोट्या कलांना प्रोत्साहन देतात. पण भारतात मात्र उदासीनता आढळत असल्याची खंत ते व्यक्‍त करतात. मराठी माणसांनी सुरू केलेला सर्कस हा प्रकार अवगत केला. केरळी लोकांनी या कलाप्रकाराचे महत्व ओळखले पण मराठी मातीस या कलेचा विसर पडणे दुर्दैवी असल्याचेही ते सांगतात. कलावंतांना पेन्शन व अन्य सुविधा मिळण्याची नितांत आवश्‍यकता असल्याचे ते सांगतात.