नेता नव्हे, मी अभिनेताच बरा- शाहरुख खान

पीटीआय
मंगळवार, 31 जानेवारी 2017

गुजरातमधील अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाची भूमिका 51 वर्षीय शाहरुखने साकारली आहे. त्याच्या या व्यवसायाला आव्हान देत तो बंद पाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका नवाजुद्दीन सिद्दिकी याने साकारली आहे. 

मुंबई- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रईस' या चित्रपटातील भूमिकेत अभिनेता शाहरुख खान निवडणूक लढविताना दिसतो. मात्र, वास्तविक जीवनात आपल्याला राजकारणातील काहीही कळत नाही, त्यामुळे त्यापासून दूर राहणे पसंत करतो, असे शाहरुखने म्हटले आहे. 

गुजरातमधील अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाची भूमिका 51 वर्षीय शाहरुखने साकारली आहे. त्याच्या या व्यवसायाला आव्हान देत तो बंद पाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका नवाजुद्दीन सिद्दिकी याने साकारली आहे. 
'रईस'च्या यशाबद्दल आयोजित कार्यक्रमावेळी बोलताना शाहरुखने राजकारणाबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी शाहरुखसोबत नवाजुद्दीन सिद्दिकी आणि सनी लिओनी हेदेखील उपस्थित होते. 

'रईस'मध्ये साकारलेल्या भूमिकेप्रमाणे राजकारणात प्रवेश करायला आवडेल का असे विचारले असता शाहरुख म्हणाला, "दुसरा कोणी बनण्यापेक्षा मी अभिनेताच राहीन. मी अभिनय करतो. मी ते (राजकारण) करू शकत नाही. मी जर ते करायला लागलो तर, जीवच निघेल माझा तर. मला राजकारण माहीत नाही, आणि मला ती करायची इच्छाही नाही."