पालकांनो, मुलांना रिअॅलिटी शोमध्ये घालताय? सुनिधी काय म्हणते पहा

टीम ई सकाळ
मंगळवार, 18 जुलै 2017

'मेरी आवाज सुनो'सारख्या रिअॅलिटी शोमधून भारताला सुनिधी चौहानसारखी गायिका मिळाली. अवघ्या 13 व्या वर्षी तिने विजेतेपद पटकावले. आता मात्र हीच गायिका रिअॅलिटी शोपासून लांब राहते आहे. इतकेच नाही, तर 'माझ्या मुलांना मी कधीच अशा शोमध्ये भाग घेऊ देणार नाही' असेही तिने सांगितले आहे.

मुंबई : 'मेरी आवाज सुनो'सारख्या रिअॅलिटी शोमधून भारताला सुनिधी चौहानसारखी गायिका मिळाली. अवघ्या 13 व्या वर्षी तिने विजेतेपद पटकावले. आता मात्र हीच गायिका रिअॅलिटी शोपासून लांब राहते आहे. इतकेच नाही, तर 'माझ्या मुलांना मी कधीच अशा शोमध्ये भाग घेऊ देणार नाही' असेही तिने सांगितले आहे. 

आपल्या मुलाला वा मुलीला रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायला लावून आपली स्वप्ने पूर्ण करू पाहणाऱ्या पालकांसाठी सुनिधीने एकप्रकारे धोक्याचा इशाराच दिला आहे. ती म्हणाली, 'माझ्या मुलांना मी कधीही अशा शोमध्ये भाग घेऊ देणार नाही. अशाने मुलांना ग्लॅमरची लवकर चटक लागते. ती मुले नको त्या वयात मोठी होतात. त्यांचे बालपण हरवते आणि त्यांच जगणे कठीण होऊन बसते.'

एका मुलाखतीसाठी आलेल्या सुनिधीला रिअॅलिटी शोबद्दल विचारणा केली असता तिने आपले हे मत मांडले. 'लहान वयात मुलांनी शिक्षण घेणे आवश्यक असते. त्यावेळी ही मुले प्रसिद्धीच्या झोतात येतात. मी स्वत: हा अनुभव घेतला आहे. बाकीच्या पालकांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण मी मात्र माझ्या मुलांना कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये भाग घेऊ देणार नाही', असेही तिने सांगितले.