शाळेतल्या बाकावर पुन्हा एकदा... 

भक्ती परब  
सोमवार, 29 मे 2017

आपण कितीही मोठे झालो तरी शाळेच्या आठवणी विसरता येत नाहीत. कारण त्या आठवणीच इतक्‍या खास असतात आणि यात सेलिब्रिटीही मागे नाहीत, बरं का! त्यांनाही त्यांच्या शाळांना अधूनमधून भेट द्यावीशी वाटते.

आपण कितीही मोठे झालो तरी शाळेच्या आठवणी विसरता येत नाहीत. कारण त्या आठवणीच इतक्‍या खास असतात आणि यात सेलिब्रिटीही मागे नाहीत, बरं का! त्यांनाही त्यांच्या शाळांना अधूनमधून भेट द्यावीशी वाटते.

काहीजण आवर्जून भेट देतातही. अशाच सेलिब्रिटींपैकी एक आहे तापसी पन्नू. तिने नुकतीच दिल्लीतील आपल्या शाळेला भेट दिली. त्याला खास निमित्तही होतं. दिल्लीतील माता जय कौर पब्लिक स्कूल ही तापसीची शाळा. या शाळेतच तापसीचं व्यक्तिमत्त्व घडलं आणि इथेच तिला आत्मविश्‍वासाने प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळत गेलं. तापसी शाळेत असताना अभ्यासएके अभ्यास असं कधीच करायची नाही. ती अभ्यासासोबत विविध खेळ, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम यातही तितकीच रमायची. अलीकडेच तिचे "पिंक' आणि "नाम शबाना' हे दोन्ही सिनेमे कौतुकास पात्र ठरले आणि तिचीही खूप वाहवा झाली. "नाम शबाना'साठी तिने सेल्फ डिफेन्सचं खास प्रशिक्षण घेतलं होतं.

तसं प्रशिक्षण शाळेतील मुलांसाठी सुरू व्हावं, असं तापसीने तिच्या शाळेच्या संस्थाचालकांना सांगितलं आणि मुलांना अभ्यासाबरोबरच खेळ, विविध कलाप्रकार यांत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी खास वर्ग सुरू करण्यात यावेत यासाठी तिने आग्रह धरला आणि शाळेनेही त्याला मान्यता दिली. सेल्फ डिफेन्सचा वर्गही सुरू करण्यात आला. त्याच्या उद्‌घाटनासाठीच खास तापसीलाच शाळेने बोलावलं. तापसीही वेळ काढून आवर्जून शाळेत आली. या वेळी शाळेतील मुलांनी तिच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. आमचे सेल्फ डिफेन्स क्‍लासेस कसे जोरात सुरू आहेत, हे दाखवण्यासाठी मुलांनी काही प्रात्यक्षिकं तापसीसमोर सादर केली. तापसी मुलांसोबत चांगलीच रमली. तिला तिच्या गुरूंना भेटून खूप आनंद झाला होता. आपल्या आवडत्या बाकावर बसल्यावर पुन्हा एकदा शाळेतील त्या साऱ्या मोरपंखी आठवणी ताज्या झाल्या. आपला हा शाळेतील दिवस खूपच मस्त मजेत गेला, असं तापसी या वेळी म्हणाली.