फिनिशिंग लाइनपर्यंत गुंतवून ठेवणारी... 

राज काझी 
सोमवार, 30 जानेवारी 2017

तीन पायांची शर्यत (नवे नाटक )

तीन पायांची शर्यत (नवे नाटक )

नाटक ही स्वेच्छेने स्वतःला फसवून घेण्याची गोष्ट आहे, असं म्हणतात! म्हणजे आपल्या समोर प्रत्यक्ष "इथं आणि आत्ता' गोष्टी घडत असतात खऱ्यासारख्या, त्या खऱ्या नाहीत हे माहीत असतानाही त्या आपण खऱ्या मानत असतो नाटकात. रहस्यनाट्यात तर ही स्वेच्छा फसवणूक पुन्हा दुप्पट किंवा दुहेरी असते. नाटककार त्याच्या सोईनं गोष्ट सांगत असतो, गोष्टी हातच्या राखीत! गंमत म्हणजे नाटकाच्या रहस्याबाबतीत आपली जेवढी दिशाभूल होईल किंवा जितके आपले अंदाज चुकतील तेवढा जास्त आनंद आपल्यालाच होत असतो! जेवढे जास्त गुंगारे देईल तितकं अधिक यशस्वी रहस्य नाटक. या निकषावर तोलता "सुयोग' व "झेलू' निर्मित "तीन पायांची शर्यत' हे नक्कीच वरच्या श्रेणीचं "सस्पेन्स थ्रीलर' ठरतं. शेवटच्या क्षणांपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याच्या नाटकाच्या या श्रेयामध्ये लेखक, दिग्दर्शकाबरोबरच नाटकातील तिन्ही कलावंतांचा वाटा बरोबरीचा आहे. 
आपल्या खात्यात मोठा लौकिक व दरारा असलेल्या एका पोलिस इन्स्पेक्‍टरला एक अतिसामान्य, परिस्थितीने विकल माणूस विनवण्या करून आपल्या घरी बोलवतो. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाला आयुष्यात पुन्हा उभं करण्यासाठी त्याला मदत हवी आहे. कायमची आंथरुणाला खिळलेली, एका असाध्य रोगानं ग्रस्त त्याची बायकोही घरात आहे... याच स्त्रीच्या जवळपास अंतिम इच्छेपोटी तिला भेटायला प्रसिद्ध व यशस्वी गुन्हेगारी कथालेखिका त्याच घरात नंतर पोचते... ही सुंदर लेखिका व तो साहसी इन्स्पेक्‍टर खरं तर त्या घरात व एकूणच एका कुटयोजनेत "ट्रॅप' झालेत! "त्या' भणंग माणसासकट या तिघांना अदृश्‍यपणे जखडून असलेला एक रक्तलांछीत भूतकाळ आहे. हे तिघेही समोरासमोर आल्यानंतर सुरू होतो तो एक जीवघेणा खेळ, थरारक व क्षणोक्षणी रंग बदलणारा. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीचे डाव, प्रतिडाव; वार व पलटवार. या शर्यतीत जो पुढे सहीसलामत निघेल, तो किंवा तिच जिवंत वाचेल. एकमेकांच्या अस्तित्वावरच उठलेले, पण एकमेकांशीच जखडलेले गेलेले. जणू "तीन पायांची शर्यत'च... 
"बिझनेस ऑफ मर्डर' या इंग्रजी नाटकावर आधारित अभिजित गुरूनं ही रंगसंहिता बांधली आहे. सुरवातीपासूनच पकड घेत टप्प्याटप्प्यानं येणाऱ्या धक्‍क्‍यांबरोबर वाढत जाणारी उत्कंठा त्यांनी लेखनात अचूक साधली. तिन्ही व्यक्तिरेखाही उत्तम रेखाटल्या गेल्या आहेत. तिन्ही व्यक्तिरेखांच्या बदलत्या रंगांबरोबर त्यांची संवादशैलीही नवे रंग दाखवीत गेली! परकीय संकल्पनांच्या "ऍडप्टेशन'मध्ये सामाजिक - सांस्कृतिक वेगळेपणाबरोबरच भिन्न व्यावहारिक वास्तवदेखील मर्यादा आणतं. (लेखन व्यवसायातून श्रीमंती वैभव कमावणे, हे मराठीसाठी एरवी "फॅन्टसी'मध्येच मोडणारं!) 
संहितेतल्या "कलाटण्या' प्रत्ययकारी फुलविण्याबरोबरच केवळ जाणिवांमधला ताण प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवांपर्यंत आणण्यामध्ये विजय केंकरेचं दिग्दर्शकीय सामर्थ्य पुन्हा एकदा इथं सिद्ध होतं. अतिशय स्वाभाविक वाटणाऱ्या हालचालींमधून हवा तो दृश्‍य परिणाम साधणारे आकृतिबंध ते लीलया उभे करतात. शर्वरीला "कॉर्नर' व "टॉर्चर' करण्यासाठीच्या जागा परफेक्‍ट तर होत्याच, पण त्यातली भीती, घुसमट नेमकी तिथं पकडली गेली! नाटक शेवटच्या क्षणापर्यंत रंगण्यामध्ये नाटकाचा वेग व इम्पॅक्‍ट यांच्यातला त्यांनी राखलेला हुकमी समतोलच कामी आला. 
संजय नार्वेकरांना आव्हान ठरणारी भूमिका दीर्घकाळानं त्यांच्या वाट्याला आली आहे. ही संधी संजयनं शतप्रतिशत "कॅश' केली आहे! विनोदी भूमिकांसाठीचे त्यांचे "पर्सनल मॅनॅरिझम्स' त्यांनी या व्यक्तिरेखेच्या विकृत छटांसाठी कसबीपणे वापरल्या. लोकेश गुप्तेनं व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने आपली भूमिका विश्वासार्ह केलीच, पण पुढची त्यातली फसगत, हतबलता, संताप संमिश्र व सूक्ष्म व्यक्त करण्याचा त्यानं प्रयत्न केला आहे. शर्वरी लोहोकरेला या नाटकातल्या तिच्या भूमिकेनं तिला मराठी रंगभूमीच्या अव्वल श्रेणीत नेऊन ठेवले आहे. प्रतिभादर्शनाचा पुरेपूर वाव असणारी तिची भूमिका तिनं परिश्रमानं "संपूर्ण' केली... या तिघांनी नाटक जिवंत केलं! 

मनोरंजन

मुंबई : टिना दत्ता हे नाव हिंदीवरच्या छोट्या पडद्याला नवं नाही. उतरन मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली. टिना सोशल मिडीयावरही बरीच...

06.33 PM

मुंबई : ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात हे योग्यचं आहे. नवे खमंग, चविष्ट, खुशखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. खरतर...

05.09 PM

मुंबई : आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शांभवी आणि...

04.03 PM