अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' वादात

पीटीआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

दिग्दर्शकाची जीभ आणणाऱ्यास 1 कोटीचे बक्षीस
नवी दिल्ली - अक्षयकुमार नायक असलेला व नीरज पांडे दिग्दर्शित "टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील विवाहाच्या दृश्‍यावर मथुरेतील साधूंनी आक्षेप घेतला असून, या पार्श्वभूमीवर बोलविलेल्या महापंचायतीत जो कोणी दिग्दर्शकाची जीभ कापून आणेल, त्याला 1 कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

चित्रपटात नंदगाव व बरसाना या दोन गावांतील मुला- मुलीचा विवाह झाल्याचे दृश्‍य चित्रीत करण्यात आले आहे. हे दृश्‍य साधूंना खटकले असून, यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याचे साधूंनी म्हटले आहे. याविषयी बरसाना गावात महापंचायत बोलवून निषेध व्यक्त करण्यात आला. दिग्दर्शकाने चित्रपटाचे नाव बदलावे, अन्यथा चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडू, अशी धमकी या वेळी बेहारीदास महाराज यांनी दिली आहे. तर एका साधूने चित्रपटाचे नाव टॉयलेट एक स्वच्छता अभियान असे करण्याचा सल्ला दिला. यामुळे जनतेत एक चांगला संदेश जाईल, असे या साधूचे म्हणणे आहे.

दरम्यान, या चित्रपटाविषयी साधूंनी याचिका दाखल करून हे दृश्‍य काढून टाकण्याची मागणी केली होती. चित्रपटाला वाढता विरोध पाहता दिग्दर्शकाने चित्रपटातून हे दृश्‍य वगळण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. चित्रपटात अक्षयकुमार व भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.

का आहे आक्षेप
बरसाणा व नंदगाव या दोन गावांपैकी एक गाव म्हणजे भगवान कृष्ण व दुसरे गाव राधा असल्याची येथील नागरिकांची धारणा आहे. त्यामुळे या दोन गावांत विवाह करणे म्हणजे मर्यादेचे उल्लंघन करणे असे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. येथील मुस्लिम कुटुंबेही या परंपरेचे पालन करतात.

Web Title: toilet ek prem katha movie in dispute