व्हरायटी एंटरटेन्मेंट लिमिटेड! येत्या चार महिन्यांत सिनेरसिकांची चंगळ

Films bollywood
Films bollywood

मुंबई : आता 2017 हे वर्ष संपायला अवघे चार महिने राहिले आहेत. त्यामुळे वर्षाचा हा शेवटचा राउंड कॅश करण्यासाठी बाॅलिवूड सज्ज झालं आहे. या चार महिन्यांत हिंदी चित्रपट रसिकांसाठी ना ना विषयांची पर्वणी आहे खरी, परंतु, छोट्या मोठ्या चित्रपटांसह चर्चेत असलेले दहा मोठे सिनेमे या चार महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत, त्यामुळे ही वर्षाखेर गोड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या चित्रपटांमध्ये बादशाहो, सिक्रेट सुपरस्टार, सिमरन, टायगर झिंदा है, गोलमाल 4, पद्मावती अशा महत्वाच्या चित्रपटांचा समावेश होतो. 

1 सप्टेंबरपासून चित्रपट प्रदर्शित व्हायला सुरूवात होईल. घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर सुरू झालेला हा सीझन पुढे ख्रिसमसपर्यंत जाईल. आता प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांत समावेश होतो तो पुढील चित्रपटांचा. या चार महिन्यांत लक्ष असेल ते बादशाहो, सिमरन, पद्मावती, गोलमाल 4, हसीना, भूमी, जुडवा या चित्रपटांवर असेल.

बादशाहो या चित्रपटात अजय देवगण, इम्रान हाश्मी, एलियाना डिक्रुझ यांसह अनेकांचा समावेश आहे. सिनेमातलं तेरी लश्के कमर हे गाणं लोकप्रिय झालं आहेच. शिवाय या सर्व कलाकारांचा आपला असा चाहता वर्ग आहे. 1975 च्या आणीबाणीच्या काळात बेतलेली प्रेमकथा यात दिसणार आहे. द डर्टी पिक्चर, कच्चे धागे, हॅटट्रीक आदी चित्रपटांचे दिग्दर्शक मिलन लुथारिया यांच्या चित्रपटाकडे आता सर्वांचं लक्ष असेल. आमीर, सलमान, अक्षय यांच्या चित्रपटानंतर अजय देवगणचा चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये जातो का ते पाहाणं लक्षणीय ठरेल.

पोस्टर बाॅईज मराठी नाटकातून बाॅलिवूडमध्ये उतरलेला आणि पाय रोवून उभा असलेला अभिनेता श्रेयस तळपदे आता दिग्दर्शनात उतरला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट पोस्टर बाॅईज आता प्रदर्शित होतो आहे. मराठीत काही वर्षांपूर्वी आलेल्या पोस्टर बाॅईज या चित्रपटाचा हा रिमेक आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहण्याजोगा असणार आहे. मराठी रसिकाच्या मनात या चित्रपटाबद्दल जरा साॅफ्ट काॅर्नर असेल यात शंका नाही. 

सिमरन या चित्रपटाकडेही सर्वांचं लक्ष आहे. आजवर कंगना राणावतने जे जे चित्रपट केले ते स्वत: च्या खांद्यावर पेलले. त्यामुळे सिमरन या चित्रपटाकडे रसिकांचं लक्ष असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता करत असल्यामुळे काहीतरी वेगळं आशयघन पाहणाऱ्या लोकांसाठी ही पर्वणी असेल. 

हसीना कुख्यात डाॅन हसीना पारकरच्या आयुष्यावर बेतलेला हसीना हा चित्रपट म्हणजे श्रद्धा कपूरसाठी एक मैलाचा दगड असणार आहे. सतत गर्ल नेक्स्ट डोअर अशाच भूमिका ती चित्रपटांमधून करते आहे, अशावेळी हसीनासारखा चित्रपट तिला अभिनेत्री म्हणून दोन पावले पुढे सरकवेल अशी शक्यता अभ्यासकांना वाटते. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट श्रध्दाच्या करिअरसाठी महत्वाचा ठरणार आहे. 

भूमी तुरूंगवासाची शिक्षा भोगून आल्यानंतर संजय दत्त पुन्हा सिनेसृष्टीत उतरला आहे. पुन्हा या इंडस्ट्रीत येण्यासाठी त्याने भूमी हा चित्रपट निवडला. या चित्रपटाची आलेली पोस्टर्स पाहता संजय दत्त पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसणार यात शंका नाही. ही एक मुलगी व बाप यांची कथा असल्याने या गोष्टीला भावनिक पदरही आहे. संजय दत्तच्या नव्या इनिंगसाठी हा चित्रपट महत्वाचा मानला जातो. 

जु़डवा 2 दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा खांद्यावर घेतली. आपल्या मुलाला दोन नव्या आणि वेगवेगळ्या भूमिकांत लोकांसमोर सादर करताना त्यांनी जुडवा हा आपलाच जुना चित्रपट निवडला. आता यात तापसी पन्नू, जॅकलिन फर्नांडिस या दोन ग्लॅमरस नायिका अाहेतच. शिवाय जुडवामधील जुनी गाणीही आता नव्याने यात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे या सिनेमाकडे लोकांचं लक्ष असेल.

सिक्रेट सुपरस्टार आॅक्टोबर महिना आला की वेध लागतात ते दिवाळीचे. आणि दिवाळी आली की प्रतीक्षा सुरू होते आमीर खानच्या चित्रपटाची. आमीर आपल्या चित्रपटांबाबत कमालीचा सजग आहे. गोष्ट सांगतानाच लोकांचं मनोरंजनही होईल आणि त्यांच्या भावनांनाही हात घालता येईल असं कसब त्याला जमलं आहे. सिक्रेट सुपरस्टार त्याला अपवाद नाही. जहिरा वासीमची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आमीरही अतरंगी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट शंभर कोटी पार करेल असा दावा ट्रेलर आल्यानंतर होऊ लागला आहे. 

गोलमाल 4 रोहित शेट्टीने सातत्याने लोकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. गोलमालचे यापूर्वीचे तीन भाग असोत वा सिंघमसारखा चित्रपट असो. डोकं न लावता चित्रपट बघण्याची मुभा तो देतो. आता तीन भाग झाल्यानंतर गोलमालचा 4 था भाग तो आणतोय. यात अजय देवगण, कुणाल खेमू, आर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर ही इरसाल मंडळी दिसतील. बऱ्याच दिवसांनी लोकांना मॅड काॅमेडी पाहता येईल.  

पद्मावती संजय लीला भन्साळी यांचा हा बहुचर्चित चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे. याच्या चित्रिकरणापासूनच अनेक वाद निर्माण झाले आहेत. राणी पद्मावती, अल्लाउद्दीन खिल्जी आणि राणा रावळ रतन सिंग यांच्या भोवती फिरते. दिपिका पदुकोन, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या या चित्रपटाची मोठी प्रतिक्षा आहे. हा चित्रपटही शंभर कोटी सहज पार करेल असा कयास बांधला जात आहे. 

टायगर झिंदा है या वर्षाची अखेर होईल ती सलमानच्या सिनेमाने. या बऱ्याच दिवसांनी सलमान खान आणि कतरीना कैफ ही जोडी सिनेमात दिसणार आहे. यापूर्वी सलमान खानची ट्युबलाईट बाॅक्स आॅफिसवर न पेटताच राहिली होती. आता तिचं अपयश धुवून काढण्यासाठी सलमान जंग जंग पछाडत असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात सलमान नेहमीच्याच दे मार लूकमध्ये असणार आहे. त्यमुळे त्याच्या फॅन्सची मोठी चंगळ होईल. 

या शिवाय छोटे मोठे बजेटचे चित्रपट येणार आहेतच. बड्या बॅनरच्या कोणत्या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो त्यावर या चित्रपटांची प्रदर्शनाची तारीख ठरलेली असते. 

सप्टेंबर: 1. बादशाहो 8. पोस्टर बाॅईज 15. सिमरन 22. हसीना, भूमी, 29. जु़डवा

आॅक्टोबर: 6. अक्सर 2, शेफ 13. हेट स्टोरी 4, 19. सिक्रेट सुपरस्टार, गोलमाल 4, 

नोव्हेंबर:17. पद्मावती, 

डिसेंबर: 8 फुक्रे रिटर्न, 22. टायगर झिंदा है

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com