'वीरे दी वेडिंग'; मल्टिप्लेक्‍सी मनोरंजन!

veere
veere

मित्रांनी केलेली धम्माल मांडणारे ‘दिल चाहता है’ किंवा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे सिनेमा जेव्हा आले होते तेव्हा सहजच एक चर्चा सुरू झाली होती, की मित्रांची गोष्ट पडद्यावर येऊच शकते सहजपणे; पण बऱ्याच काळानंतर भेटणाऱ्या अशा मैत्रिणींची गोष्ट सांगितली जाईल का पडद्यावर? हा सिनेमा त्यानंतर बऱ्याच काळानंतर आला असला, तरी तो त्याच प्रश्‍नाचं उत्तर आहे! 

करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या चौघींची या सिनेमात मुख्य भुमिका आहे, अर्थातच ही चार मैत्रिणींची गोष्ट आहे. शाळेत एकत्रित धम्माल केल्यानंतर दहा वर्षांनी त्या सगळ्या पुन्हा भेटताहेत, कालिंदी (करीना)च्या लग्नासाठी. जिला मुळात लग्नसंस्थेबद्दल काहीशी अप्रीती आहे, शंका आहेत. तिच्या आई-वडिलांच्या सततच्या भांडणांमुळे नवरा-बायकोचं नितळ नातं असूच शकत नाही, असा काहीसा समज तिने करून घेतलाय; पण तरीही रिषभ (सुमित व्यास) हा खूप चांगला मित्र असल्याने त्याला गमावण्याच्या भीतीपोटी ती लग्नाला तयार झालीय. मीरा (शिखा) ने परदेशात पळून जाऊन एका परदेशी माणसाशी लग्न केलंय. पण तिच्या घरच्यांनी तिला न स्वीकारल्याने ती अस्वस्थ आहे. साक्षी (स्वरा) ही एकदम मनमौजी मुलगी. मनाला वाटेल ते करणारी. त्यातूनच तिने केलेलं लग्न अयशस्वी ठरलंय, ती आई-वडिलांकडे परत आलीय. अवनी (सोनम) वकील आहे. तिने लग्न करावं, अशी तिच्या आईची सतत भुणभुण तिच्यामागे आहे. तिलाही त्यामुळे लग्न करावं, असं वाटू लागलंय. पण निवडावं कुणाला हे काही तिला कळत नाही. 

नायिकाप्रधान चित्रपट असला तरी यातल्या महिला उच्चभ्रू आहेत. त्यांचे प्रश्‍न, त्यांचं जगणं, त्यांचं बोलणं सारंच त्याच दर्जाचं आहे. त्यांचं वागणंही तसंच... त्यामुळेच, ‘शराब पिना, धुम्रपान स्वास्थ्य के लिये हानीकारक होता है’ ही पाटी पडद्यावर वारंवार दिसत राहते, तीही साऱ्या महिला व्यक्तिरेखा पडद्यावर दिसत असताना! 

दिग्दर्शक शशांक घोष आणि पटकथा लेखक निधी मेहरा महुल सुरी यांनी दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळातली कथा स्टायलाईज्ड पद्धतीने मांडलीय. तशाच श्रीमंतीने. पण हे उच्चभ्रू वातावरण जसं काहीसं खोटं खोटं वाटत राहातं, तसंच या सिनेमाचंही झालंय. यातल्या व्यक्तिरेखांचे प्रश्‍नही वरवरचे, खोटे खोटे वाटत राहतात. त्यांचं फ्रिक-आऊट वागणं, वाट्टेल ते, वाट्टेल त्या भाषेत बोलणं यामुळे हशा निर्माण होतो. हे सुटे सुटे प्रसंग चांगले वाटत असले तरी त्याचा एकत्रित परिणाम उणावतो. दिग्दर्शक आपल्याला नेमकं दाखवायचंय काय, हेच ठरवू शकलेला नाही. मुलींची मैत्रिणी म्हणून असलेलं बॉण्डिंग आणि त्यांनी एकत्रित केलेली धम्माल मांडायचीय की त्यांच्या आयुष्यात असलेल्या प्रश्‍नातून त्यांनी शोधलेला मार्ग दाखवायचाय, हे स्पष्ट होत नाही. शिवाय हे त्यांचे मोठे (वाटत असलेले) प्रश्‍न, सिनेमा क्‍लायमॅक्‍सकडे येताना अगदी सहजच सुटल्यासारखे वाटतात. एका वेगळ्या वाटेवर जाऊ पाहण्याची शक्‍यता असलेला सिनेमा त्यामुळेच शेवटी ‘...आणि ते सुखाने नांदू लागले’छाप परिकथेच्या वळणावर जातो. 

चित्रपटाची निर्मिती थाटात केलीय, तांत्रिक बाजूही उत्तमच. संगीत मात्र ‘चालसे’ छापाचं. हा चित्रपट (मध्यमवर्गीयांनी) आपल्या कुटुंबाबरोबर पाहण्याचा नाहीच. याच्या निर्मात्यांनाही ते माहीत असावंच. उच्चभ्रू आणि तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवूनच या ‘मल्टिप्लेक्‍सी मनोरंजना’चा घाट घालण्यात आला असावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com