रंगभूमीः थोडे चटके; काही हटके

amar photo studio
amar photo studio

वर्षातला शेवटचा दिवस, सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाचीही चाहूल लागली आहे. गतकाळातील सर्वच क्षेत्रांतील घडामोडींचे अवलोकन करणे महत्त्वाचे आहे, कारण येणाऱ्या नव्या वर्षात त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्यच असते. म्हणूनच विविध क्षेत्रांत घडलेल्या -बिघडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची ही नोंद. ही नोंद जशी तुमच्या आठवणी ताज्या करेल तसेच तुम्हाला भविष्यातील घडामोडींची चाहूलही देईल. 

गेल्या वर्षभरात व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्या नाटकांवर नजर टाकली तर दिसेल असं की नव्या नाटकांपेक्षा जुनी नाटकंच भाव खाऊन गेलीत. नवी नाटकं आली. नवे प्रयोगही झाले. त्यातली काही उत्तम होतीही; पण त्यातली अनेक अशी होती की, मास्टर असूनही आपली ब्लास्टर कमाल नाही दाखवू शकलेली. जुनी नाटकं मात्र दीपस्तभांसारखी स्थिर दिसतात. या वर्षभरात विनोदाचा काहीसा वरचष्मा राहिला खरा; पण इतर गंभीर विषय ही आले. मराठी रंगभूमीची बहुवि धता दा खवणारे हे विषय होते. मराठी व्यावसायिक रंगभूमीवरची अनेक नाटकं या पूर्वी गुजराती रंगभूमीने स्वीकारली. कोडमंत्रच्या निमित्ताने गुजराती नाटक मराठी रंगभूमीने स्वीकारल्याचे चित्र दिसलं; पण या सगळ्या घडामोडीत नोटाबंदीचा मोठाच फटका नाटकाच्या बुकिंगला बसला, हे मान्य करायलाच हवं. त्यामुळेच हल्ली नाटकांच्या जाहिरातीत, क्रेडिट कार्ड स्वीकारली जातील, असा ठळक उल्लेख दिसतो. ऑनलाईन बुकिंगचा पर्याय ही मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जाताना दिसतोय. 

याशिवाय या वर्षांत काही वाद ही गाजले. नाट्यनिर्माता संघ आणि व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धा या वादामुळेच जास्त चर्चेत राहिल्या; पण या सगळ्या अडचणी, अडथळे असले, तरी मराठी माणसाच्या मनातलं नाटकाविषयीचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.त्यांच्या आयुष्यातला नाट्यरंग कायम राहिला. 

यूटर्न 
पूर्वी कलाकारांचा प्रवास रंगभूमीवर सुरू व्हायचा आणि सिनेमा- सिरियलच्या दिशेने वळायचा; पण सध्या मात्र त्यांनी यूटर्न घेतल्यासारखं दिसतंय. दिल दोस्ती दुनियादारीच्या टीमने आणलेलं अमर फोटो स्टुडियो हे त्याचं उत्तम उदाहरण. याचे प्रयोग जोरदार सुरू आहेत. (क्रेडिट कार्ड बुकिंगसह) अर्थात यातले अनेक कलाकार या पूर्वीही रंगभूमीवर काम करत होतेच; पण ते होते स्पर्धेसाठी किंवा हौशी-प्रायोगिक रंगभूमीवर.

व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पाऊल बहुधा त्या मालिकांमुळेच अधिक ठामपणे पडलं. सुरुची आडारकर आणि सुयश टिळक ही जोडीही स्ट्रॉबेरी या नाटकातून आली. सुरुवात चांगली झालीही होती प्रयोगांची; पण अचानक ते 
थंडावलेले दिसताहेत. या कलाकारांबरोबर ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, शशांक केतकर, सौरभ गोखले, चिन्मय उदगिरकर, कादंबरी कदम असे मालिकांतून गाजलेले व्यावसायिक रंगभूमीवर दिसले. 

जुनं ते सोनं 
यूटर्नसारख्या गाजलेल्या गंभीर नाटकाचा सिक्वल म्हणजे यूटर्न- येणं ही उत्तमच गोष्ट. काही जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन होऊन या वर्षी ती नव्याने रंगभूमीवर आली. राजा गोसावींनी चालवलेली सौजन्याची ऐशी तैशी आता भरत जाधव करणाराय. त्याच्या सोबतीला दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे आहेच. त्यांनी हे नाटक आताच्या काळातलं आणि त्यांच्या स्टाईलने केलंय म्हणे."दीपस्तंभ' हे चंद्रलेखाचं नाटकही नव्याने आलंय. त्या वेळी अमिता खोपकरला या नाटकाने ओळख दिली होती. शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी धम्माल करायचे. आता ती जबाबदारी नव्याने प्रियदर्शन जाधव आणि भाऊ कदम यांनीपेललीय. "किमयागार'मध्ये भक्ती बर्वेची किमया संपदा कुलकर्णी करू पाहतेय. अर्थात ही सारी नाटके जुनी असली, तरी नाटकाबद्दलची"प्ले ईज द थिंग' ही गोष्ट सिद्ध करणारीच आहेत.

वादाशिवाय रंग नाही

रंगभूमीच्या संदर्भातले दोन वाद प्रामुख्याने गाजले. पहिला म्हणजे नाट्यनिर्माता संघामधला वाद. नाट्यनिर्माता संघाच्या जुन्या कार्यकारिणीने राजीनामे दिले. प्रशांत दामले या कार्यकारिणीत अध्यक्ष होते. राजीनामे दिल्यामुळे निवडणूक घेण्याचा निर्णय झाला; पण प्रत्यक्षात 11जणांची नवी कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली. त्यांनी अध्यक्षपदी प्रसाद कांबळी आणि सचिवपदी संतोष काणेकरांची निवड केली; पण या नव्या कार्यकारिणीला दप्तर देण्यास जुन्या कार्य कारिणीने विरोध केलाय. दुसरा वाद नाट्यस्पर्धेचा. गेल्या वर्षी ही स्पर्धा झालीच नव्हती. यंदा ती झाली, तर त्यावर काही निर्मात्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे यंदा या स्पर्धेत होती ती फक्त चार नाटकं. यावरून आता आतापर्यंत चर्वितचर्वण सुरू होतं. 

समांतर हालचाली 
व्यावसायिक रंगभूमीवर कोडमंत्र, अमर फोटो स्टुडियो, यूटर्न- असे काही वेगळे प्रयोग होताना, समांतर रंगभूमीही उजळलेली दिसली. मकरंद देशपांडे यांनी मराठी रंगभूमीसाठी शेक्‍सपियरचा म्हातारा ही आपली कलाकृती एका महोत्सवासाठी सादर केली. महोत्सवाबाहेरही त्याचे प्रयोग होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव नक्कीच मिळण्याची शक्‍यता आहे. हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर मकरंदचं नाव आधीच गाजलेलं आहे. तिथले मकरंदचे चाहते कदाचित मराठीकडे त्यानिमित्ताने वळण्याची शक्‍यताही निर्माण झाली आहे. 

रंग असे आणि तसे 
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी हरहुन्नरी कलाकार जयंत सावरकर यांची झालेली निवड अनेकांना समाधान देऊन गेली. अंतरी नाना कळा असलेल्या या वामनमूर्ती कलाकाराने आपल्या उत्तुंग अभिनयाची ओळख या पूर्वी करून दिलेली आहेच. आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीतही ते तशीच कामगिरी करून दाखवतील, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. या कालावधीत रंगभूमीने काही अनमोल रत्ने गमावली. आविष्कार चळवळीचा आधारस्तंभ असलेल्या सुलभा देशपांडे यांचं निधन झालं. अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा अपघाती मृत्यूही असाच चटका लावून गेला. जुनेजाणते नेपथ्यकार बापू लिमये यांचेही नुकतेच निधन झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com