‘वाडा’ नाट्यत्रयीचे मोजकेच ११ प्रयोग ! रविवार १ ऑक्टोबर रोजी शुभारंभ 

yugant new marathi drama esakal news
yugant new marathi drama esakal news

पुणे : ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’  ही महेश एलकुंचवार लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातलं ‘युगान्त’ हे तिसरं नाटक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी रसिकांसाठी १ ऑक्टोबरला घेऊन येणार आहेत. जीवनानुभव देणाऱ्या या तीनही नाटकांचा सलग ९ तासांचा अविस्मरणीय नाट्यानुभव यानिमित्तानं प्रेक्षकांना लवकरच घेता येईल. यासंबधी अधिक माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ करत असताना माझ्यावर थोडसं दडपण होतं. हे नाटक जरी चांगलं असलं तरी आताच्या काळात चालेल का? असा प्रश्न माझ्या मनात होता, पण ‘वाडा चिरेबंदी’ व ‘मग्न तळ्याकाठी’ला  मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून लक्षात आलं की, पस्तीस वर्षापूर्वी एका नाटककारानं लिहिलेलं, महाराष्ट्रातल्या एका कुटुंबात घडणारं हे नाटक आजही प्रेक्षकांना भिडतं आहे. याचा अर्थ ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक आहे. ‘युगान्त’ आणल्यानंतर हे नाट्यवर्तुळ पूर्ण होईल या उद्देशानं ही ‘नाट्यत्रयी’ प्रेक्षकांसाठी रंगमंचावर आणत आहोत. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अशी ‘नाट्यत्रयी’ प्रथमच सादर होत आहे हे विशेष. म्हणूनच महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडणारी ही अभिजात नाट्यकृती सादर होणं ही ऐतिहासिक गोष्ट असून ती महाराष्ट्रभर पोहचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभिजात कलाकृतीसाठी कलाकारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी कलाकारांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी उपस्थितीत सर्वच कलावंतांनी आपली मनोगतं, अनुभव यावेळी कथन केले. तसचं चांगल्या प्रकल्पाचा भाग होता आलं याचा आनंद ही व्यक्त केला.

या ‘नाट्यत्रयी’चा पहिलावहिला प्रयोग रविवार १ ऑक्टोबर २०१७ ला  रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या ‘नाट्यत्रयी’चे मोजकेच ११ प्रयोग  होणार असून ते दर रविवारी सादर होतील. मुंबई- पुण्याशिवाय महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणीही प्रयोग करण्याचा निर्माते व दिग्दर्शकांचा मानस आहे. या ‘नाट्यत्रयी’चं ऑनलाईन बुकिंग बुधवार २० सप्टेंबरपासून सुरु झालं असून सलग नाट्य प्रयोगच्या तिकीटांसोबत नाटकाच्या तिनीही भागांची स्वतंत्र तिकीटंसुद्धा साईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तिकीट विक्रीच्या दिवसापासून सीझनं तिकिटं बुकिंग काऊंटरवर उपलब्ध होतील.

बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ, बदलते नातेसंबंध, भावभावनांचा भव्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या नाटकाची निर्मिती ‘जिगीषा’ व ‘अष्टविनायक’ यांची आहे. लेखन महेश एलकुंचवार यांचं असून दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचं आहे.

निवेदिता सराफ, भारती पाटील,  वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, अजिंक्य ननावरे, दीपक कदम, विनिता शिंदे, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, पूर्वा पवार, राम दौंड, आणि बालकलाकार स्वानंद शेळके या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत आनंद मोडक, राहुल रानडे यांचं आहे. प्रकाश योजना रवी रसिक यांची आहे. वेशभूषा प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर याचे निर्माते असून सहनिर्माते अर्जुन मुद्दा व संज्योत वैद्य आहेत. जीवनानुभव देत वास्तवाचा ठाव घेणारी ही ‘नाट्यत्रयी’ निश्चितच एक अविस्मरणीय नाट्यानुभव देऊन जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com