#SakalForMaharashtra एकत्र येऊया, मार्ग काढूया उपक्रमावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया

sakal
sakal

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

कृतिगट स्थापन करावा 
शेती व्यापारातील धोरणात्मक आव्हाने-अडथळे, जसे - निर्यातीरील निर्बंध, बॉर्डरबंदी, स्वस्त आयात, शेतीविरोधी नियम-अटी आदी बाबतीत 'सकाळ' आणि 'अॅग्रोवन' नेहमी शेतकऱ्यांची बाजू मांडते. यापुढे केवळ बातमी देऊन न थांबता असे प्रश्न सुटण्यासाठी एखादा कृतिगट जर सकाळने स्थापन केला, तर त्यात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. वरील आव्हानांचा संबंध थेट शेतीचा पेचप्रसंग आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आहे. आज भारताची कृषी निर्यात सुमारे 30 अब्ज डॉलर्सच्या आसपास असून, खरे तर ती 100 अब्ज डॉलर्सच्या घरात जायला हवी. उत्पादनवाढ, पुरवठावाढ हीच शेतीची आजची डोकेदुखी आहे. शेजारचा चीन देश 12 अब्ज बिलियन डॉलर्सच्या सोयाबीनची आयात अमेरिका खंडातून करतो. भारत-चीनमधील व्यापारी तूट 60 अब्ज डॉलर्सच्या वर गेली आहे. थोडक्यात, आपल्या शेजारी देशांतच व्यापाऱ्याच्या मोठ्या संधी आहेत. त्या साधण्यासाठीच शेती उत्पादन-उद्योग-व्यापार-निर्यात आदी क्षेत्रातील लोकांच्या कृतिगट-दबावगटाची आज आवश्यकता आहे. 'सकाळ'सारख्या माध्यमाकडून ही अपेक्षा आहे.  
- दीपक चव्हाण, शेती अभ्यासक, पुणे

सर्व क्षेत्रात एकत्रितपणे काम होऊ शकते
'एकत्र येऊया..' मधून एक चांगला विचार सकाळ समूहाने मांडला आहे. विविध घटकांनी यामध्ये सहभागी व्हायला हवे. अशाप्रकारे पुढाकार घेऊन कौशल्य विकास, व्यवसाय मार्गदर्शन यावर नक्कीच एकत्रितपणे काम होऊ शकते. कायद्याच्या अभ्यासक्रमाबाबत, त्यातील संधीबाबत या माध्यमातून मार्गदर्शन करायला नक्कीच आवडेल. मुलांना कोर्टात बाजू कशी मांडायची हा महत्वाचा भागही यामध्ये आपण घेऊ शकतो. कायद्याच्या क्षेत्रात असलेल्या पण विशेष माहिती नसलेल्या बाबींची माहितीही तरुणांपर्यंत पोहचवता येईल
-अॅड. दत्ता माने, मुंबई उच्च न्यायालय

भरीव काम करण्याचा प्रयत्न
सकाळने सुरू केलेला हा प्रयत्न उत्तम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकत्र आणून समाजासाठी काम करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे योजना आखून काही भरीव काम करण्याचा प्रयत्न असायला हवा. या उपक्रमात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल, त्यासाठी एकत्रितपणे विचार करता येईल. एकत्रितपणे काम केल्यामुळे त्याचा अधिक उपयोग समाजघटकांसाठी होऊ शकतो. त्यादृष्टीने आपण काम करू शकतो.
- मुमताज शेख, कोरो समन्वयक

स्वतःच स्वतःला मदत करणे गरजेचे
सरकारच आपली कायम मदत करेल असे नाही आपण स्वतःच स्वतःला मदत करणे गरजेचे आहे. मी एक नर्तक म्हणून माझ्या क्षेत्राबद्दल सांगू शकतो. आजकाल नृत्य शिकण्यासाठी फक्त गुरूचीच गरज आहे असा नाही. आजाकल यूट्यूबच्या माध्यमातूनही शिकू शकतो. त्यातून शिकून अनेक स्पर्धा वगैरे असतात त्यामध्ये भाग घेऊन किंवा रिअलिटी शो मध्ये भाग घेऊन आपले करियर आपण स्वतः घडवू शकतो. सकाळने चालू केलेल्या या उपक्रमातून अनेक लोकांना मार्गदर्शन मिळू शकते असे मला वाटते. 
- मयुर वैद्य, नृत्य दिगदर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com