औरंगाबाद - नाल्यात पडून एकाचा मृत्यू 

dead_body
dead_body

औरंगाबाद : जयभवानीनगर भागातील नाल्यात झालेले अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासन गेल्या वर्षभरापासून टाळाटाळ करत असल्याने अखेर मंगळवारी (ता. 19) रात्री एकाचा बळी गेला. रात्रीच्या अंधारात नाल्याच्या पाण्यात पडलेल्या तरुणाचा बुधवारी (ता. 20) सकाळी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या महापालिका पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

जयभवनीनरातील नाल्याचा विषय गेल्या वर्षभरापासून गाजत आहे. अतिक्रमणांमुळे पावसाची पाणी जाण्यास जागाच शिल्लक नसल्याने गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसात शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नाल्याची पाहणी करून अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र नागरिकांच्या विरोधातपुढे नमते घेत महापालिका एक-एक अतिक्रमण हटवीत आहे. अद्याप तीन घरांचे अतिक्रमण कायम आहे. त्यामुळे एक जूनला झालेल्या पहिल्याच घरांमध्ये पुन्हा पाणी शिरले. मात्र त्यानंतरही महापालिकेने कारवाई केली नाही. मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे नाला तुडुंब भरला होता. रात्री 11 वाजेच्या सुमारास रस्त्यावर पाणी साचलेले असल्याने एकजण कडेने जात असताना त्यांचा अचानक तोल गेला व ते नाल्यात पडले. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. आरडा-ओरड केल्यानंतर काही जण मदतीला धावले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र पहाटेपर्यंत शोध घेऊनही त्यांचा मृतदेह सापडला नाही. सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता पुलाखाली काही अंतरावरच मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घाटीत पाठविला मात्र ओळख पडली नव्हती. 

अर्धा तास उशिरा आली ऍब्युलन्स 
नगरसेवक प्रमोद राठोड, माजी नगरसेवक बालाजी मुंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन 108 क्रमांकावरून फोन करून ऍब्युलन्स मागविली. मात्र अर्धातास उशिराने म्हणजेच ऑटोरिक्षाने मृतदेह घाटीत पाठविल्यानंतर ऍब्युलन्स आली. यावेळी माणूस जिवंत आहे का? असे प्रश्‍न देखील समोरून विचारण्यात आल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले. 

हद्दीवरून वाद 
जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील हा नाला मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे की, पुंडलीकनगरच्या यावरून बराच वेळ वाद झाला. शेवटी हद्द नसताना देखील पुंडलीकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

आणखी किती बळी घेणार?
घटनेची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. आणखी किती जणांचे बळी घेणार आहात? असा सवाल करत साहेब, गरिबांना मारू नका हो... असे आर्जव नागरिकांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com