दहा लाख शेतकरी, व्यापारी सावकारी पाशात

शेखलाल शेख
गुरुवार, 11 मे 2017

कित्येक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने नाइलाजाने सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. यामध्ये बिगर नोंदणीकृत सावकारसुद्धा कोट्यवधी रुपयांचे कर्ज चढ्या टक्केवारीने सर्रासपणे देतात

औरंगाबाद - राज्यात सावकारी तेजीत असून, वर्षभरात केवळ परवानाधारक सावकारांनी 10 लाख 56 हजार शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपल्या पाशात घेतले आहे. या घटकांना वर्षभरात (2016) तब्बल 1 हजार 254 कोटींचे कर्जवाटप केले आहे. 2015 च्या तुलनेत सावकारी कर्जवाटपात 40 टक्के वाढ झाली आहे. ग्रामीण भाग अवैध सावकारीत अडकलेला असून, त्यांनी केलेल्या कर्जवाटपाचा यात समावेश नाही, हे विशेष.

शेतमालाचे पडलेले भाव, वर्षानुवर्षे डोक्‍यावर वाढणारा कर्जाचा डोंगर, दुष्काळ, नापिकी आणि गारपिटीमुळे कबरंडे मोडलेला शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारात उभा राहत आहे. शेतीमधून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने, लग्न, मुलांचे शिक्षण, बियाणे, खतांसाठी त्याला सोने, जमीन गहाण ठेवून सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. दैनंदिन व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांनाही सावकारांच्या दारी जावे लागत आहे. राज्यात 12 हजार 208 परवानाधारक सावकार असून, ते या घटकांची गरजपूर्ती करीत आहेत. त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना 2016 मध्ये 1 हजार 254 कोटी कर्जरूपी दिले आहेत. 2015 मध्ये परवानधारक सावकारांनी केलेल्या कर्जवाटपाचा आकडा होता 894 कोटी.

शेतकऱ्यांची भिस्त पीक कर्जावर
बहुतांश शेतकऱ्यांची खरीप, रब्बी हंगामासाठी भिस्त ही पीक कर्जावर असते. कर्जाचे पैसे हाती पडल्यानंतर खते, बियाणे घेऊन शेतकरी पेरणी करतात; मात्र कित्येक शेतकऱ्यांना मागणी करूनही पीक कर्ज वेळेवर मिळत नाही. मागील वर्षी पीक कर्जासाठी बॅंकेत रांगा लागल्या होत्या. 2015-16 मध्ये सर्व बॅंकांनी मिळून 72 हजार 865 कोटी रुपयांचे कृषी मुदत आणि पीक कर्ज वाटप केले होते. यामध्ये 40 हजार 581 कोटी रुपयांचे पीक कर्ज, तर 32 हजार 284 कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप झाले होते. तरीही कित्येक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने नाइलाजाने सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. यामध्ये बिगर नोंदणीकृत सावकारसुद्धा कोट्यवधी रुपयांचे कर्ज चढ्या टक्केवारीने सर्रासपणे देतात. मराठवाड्यात 2016-17 मध्ये बॅंकांतर्फे सुमारे 9 हजार 946 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले. 2014-15 मध्ये 13 हजार 546 कोटी, तर 2015-16 मध्ये 8 हजार 880 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. मराठवाड्यात चालू वर्षात 13 हजार कोटींपेक्षा जास्तीचे पीक कर्ज वाटप होणार आहे.

दोन हजार जणांना नव्याने परवाने
ग्रामीण भागात परवानाधारक सावकार असले, तरी अवैध सावकारी करणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. राज्यात 2016 मध्ये 12 हजार 208 सावकार होते. याच वर्षात एक हजार 947 नवीन सावकारांना परवाने देण्यात आले आहेत. सात हजार 725 सावकारांचे परवान्यांचे नूतनीकरण झाले. 719 परवाने रद्द करण्यात आले.

अशी ही राज्यातील सावकारी
तपशील............................2015..........................2016
परवानाधारक सावकार..............12022............................12208
नवीन दिलेले परवाने................1589..............................1947
नूतनीकरण केलेले परवाने..........7852...............................7725
रद्द केलेले परवाने..................477.................................719
कर्जदार सभासद..................7,04,452..........................10,56,273
वाटप कर्ज (कोटीत)......896.34.............................1,254.97