हिंगोली जिल्ह्यात 'जलयुक्त’च्या अठराशे कामांना सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

हिंगोली- जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये मागील आर्थिक वर्षातील तब्बल आठराशे कामांना मुहूर्त लागला असून, जूनअखेर सव्वादोन हजार कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

हिंगोली- जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये मागील आर्थिक वर्षातील तब्बल आठराशे कामांना मुहूर्त लागला असून, जूनअखेर सव्वादोन हजार कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१५-१६ या आर्थिक वर्षात चार हजार कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सिमेंट बंधारे बांधकाम, नाला खोलीकरण, सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण, तलावातील गाळ काढणे आदी प्रमुख कामांचा समावेश आहे. कृषी विभाग, पंचायत विभाग, वनीकरण विभाग, वन विभाग, लघुसिंचन विभागामार्फत ही कामे केली जात आहेत. या कामांमुळे भूगर्भातील पाणीपातळीत दोन ते अडीच मीटरने वाढ झाली आहे.

दरम्यान, मागील आर्थिक वर्षात सव्वादोन हजार कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रत्यक्षात कामे सुरू करण्यास उशीर होत असल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन खडे बोल सुनावले होते. कुठल्याही परिस्थितीत जूनअखेर कामे पूर्ण झाली पाहिजेत, कमी कामे करणाऱ्या यंत्रणांवर कार्यवाहीचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर सर्वच यंत्रणांनी कामांना सुरवात केली असून आतापर्यंत आठराशे कामांना सुरवात झाली आहे. जूनअखेर कामे पूर्ण झाल्यास यावर्षी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवता येणे शक्‍य होणार आहे.