बोंडअळीग्रस्तांसाठी २५६ कोटी मंजूर

Bond-Worm
Bond-Worm

बीड - गेल्या वर्षीच्या खरिपातील कापूस पिकाची बोंडअळीने झालेल्या नुकसानीची अखेर भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील सहा लाख ९२ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून, प्रशासनाने मागणी केलेली सर्वच २५६ कोटी ५८ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम तीन टप्प्यांत मिळणार असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी भरपाईची रक्कम टाकली जाईल. आगामी आठवड्यात मदतीच्या रकमेतील ८५ कोटी ३३ लाख रुपयांचा पहिला टप्पा भेटणार आहे. 

सिंचनाचे साधन नसल्याने नगदी पीक म्हणून जिल्ह्यात कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात तब्बल तीन लाख ७७ हजार हेक्‍टर क्षेत्रांवर कपाशीची लागवड झाली होती. मात्र, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने उत्पन्नात निम्म्याहून अधिक घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, एनडीआरएफमधून मदत मिळण्यासाठी ३३ टक्के नुकसानीचा निकष आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या नुकसानीच्या अंतिम अहवालानुसार शासनाने जिरायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी सहा हजार ८०० रुपये, तर बागायती जमिनीवरील कपाशीसाठी हेक्‍टरी १३ हजार ५०० रुपये मदत देण्याची तरतूद केली.

दरम्यान, बोंडअळीने झालेल्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी विविध संघटना व पक्षांनी आंदोलने केली. शेतकऱ्यांनीही विविध मार्गाने आवाज उठविला. सुरुवातीला कृषी विभागाने केलेल्या पंचनामा अहवालावर मोठ्या प्रमाणावर अक्षेप आले. अखेर चार महिन्यानंतर बोंडअळीने नुकसानीची भरपाई मंजूर झाली असून, त्याचा लाभ सहा लाख ९२ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. 

केवळ अंबाजोगाईतच बागायती कापूस
दरम्यान, जिरायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये आणि बागायती क्षेत्रावरील कपाशीसाठी १३ हजार पाचशे रुपये हेक्‍टरी मदत आहे. मात्र, पंचनाम्यात अख्ख्या जिल्ह्यात केवळ अंबाजोगाई तालुक्‍यातील ६१ हेक्‍टर बागायती क्षेत्रावरच कपाशी लागवड दाखविलेली आहे.

तालुकानिहाय भरपाईची रक्कम 
तालुका    शेतकरी    भरपाईची रक्कम

बीड    १४०१२१    ५२ कोटी ५९ लाख रुपये
गेवराई    १४१८४९     ५० कोटी रुपये 
शिरूर    ३५४९०    १९ कोटी ८४ लाख रुपये
आष्टी    ४५३१९    १८ कोटी ७७ लाख रुपये
पाटोदा    ५४२५०    १४ कोटी ८८ लाख रुपये
माजलगाव    ७६७६७    २५ कोटी १८ लाख रुपये
धारूर    ४४७८१    १६ कोटी आठ लाख रुपये
वडवणी    ३२४३७    १५ कोटी दोन लाख रुपये 
केज    ७९४९६    २६ कोटी ६१ लाख रुपये
अंबाजोगाई    १२७३८    पाच कोटी ७० लाख रुपये
परळी    २८७९०    १२ कोटी ४० लाख रुपये
एकूण    ६९२०३८    २५६ कोटी ५८ लाख रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com