महापालिका आयुक्‍तांच्या पाहणीत आढळले 32 कर्मचारी गैरहजर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

औरंगाबाद - महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी बुधवारी (ता. 26) सकाळी मुख्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. या पाहणीत तब्बल 32 कर्मचारी गैरहजर आढळून आले. या गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

औरंगाबाद - महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी बुधवारी (ता. 26) सकाळी मुख्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. या पाहणीत तब्बल 32 कर्मचारी गैरहजर आढळून आले. या गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

महापालिका आयुक्‍त म्हणून डी. एम. मुगळीकर यांनी बुधवारी (ता. 26) सकाळी साडेदहा वाजेपासून वेगवेगळ्या विभागांत जाऊन पाहणी सुरू केली व कामकाजाची तपशीलवार माहिती घेतली. लेखा विभागापासून त्यांनी सुरवात केली. एकूण 27 विभागांची पाहणी केली. प्रत्येक विभागात हजेरी रजिस्ट्रर घेऊन हजेरी घेतली. हजर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप विचारले, त्यांच्या फाईली, रजिस्टर, विभागातील कपाटे त्यांनी उघडायला लावली. वेळप्रसंगी या कपाटाच्या चाव्या त्यांनी मागवून घेतल्या आणि त्यातील साहित्याची पाहणी केली. प्रकल्प विभागाची पाहणी करताना कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांना सर्वप्रथम आढळून आले. गैरहजर कर्मचारी कोण आहेत, त्यांचे फिल्डवर्कचे काम आहे का? ते खरेच फिल्डवर्कवर आहेत की नाही याची माहिती घेतली. ही पाहणी संपल्यानंतर आयुक्तांनी जे कर्मचारी फिल्डवर्कवरही नाहीत आणि कार्यालयातही नाहीत अशांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. 

प्रशासकीय तथा मालमत्ता विभागात जप्त करून आणलेले, अतिक्रमणाचे साहित्य विखरून पडल्याचे दिसले. ते सर्व साहित्य टाऊन हॉलशेजारी असलेल्या बॅडमिन्टन हॉलमध्ये प्रत्येक विभागाचे पार्टिशन करून त्यात ठेवण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी ऐतिहासिक टाऊन हॉलचीही पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बॅडमिन्टन हॉल पाहण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, तासभर होऊनही बॅडमिन्टन हॉलची चावी नेमकी कुणाकडे आहे, याचा पत्ता लागला नाही. मालमत्ता विभागाचे हेमंत कोल्हे आणि वामन कांबळे यांना चावी नेमकी कुणाकडे आहे हे शेवटपर्यंत खात्रीलायक सांगता आले नाही. नगररचना विभागात शहरातील मार्किंग संदर्भात माहिती घेण्यासाठी काही रहिवासी आले होते. आयुक्‍तांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे विभागातील कर्मचाऱ्यांना आदेश दिले. याच विभागातील काही पंखे बंद असल्याने त्याबाबत विचारणा केली असता तिथे कोणी बसत नाहीत, सतत फिल्डवर्कवर असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आयुक्‍तांनी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडे बंद पंख्यांविषयी विचारले; मात्र त्यांनी टोलवाटोलवी करणारी उत्तरे दिली. यावरून त्यांना सर्व फायली घेऊन दालनात येण्याचे आदेश दिले.