औरंगाबादमध्ये केवळ पाच मदरशांना अनुदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

औरंगाबाद - डॉ. झाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेत कागदोपत्री प्रस्ताव तयार करून अनेकांनी आपले खिसे भरल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर अल्पसंख्याक विभागाने अनुदान लाटणाऱ्यांना चांगलाच झटका दिला आहे. 31 मार्चला औरंगाबाद जिल्ह्यातील फक्त 5 मदरशांनाच 14 लाख 30 हजारांचे अनुदान मंजूर झाले; तसेच राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 155 मदरशांना 6 कोटी 21 लाख 76 हजार 113 रुपयांचे अनुदान मंजूर केले. हे करताना कागदपत्रांची कडक तपासणी करण्यात आल्याने अनुदानाच्या रॅकेटमध्ये सक्रिय असणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू विषयांचे शिक्षण देणे, नववी, दहावी आणि बारावी; तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयांसाठी अनुदान देणे, शिक्षकांच्या मानधनासाठी 11 ऑक्‍टोबर 2013 रोजी डॉ. झाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना सुरू करण्यात आली. यामध्ये मदरशांना दोन ते साडेचार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. सर्वाधिक अनुदान औरंगाबाद जिल्ह्यातील मदरशांना देण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. काही जणांनी यामध्ये लाखो रुपये लाटून विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा स्वतःचे खिसे भरले. राज्यात तर अनुदान लाटण्यासाठी मार्गदर्शन करणारे रॅकेट तयार झाले. अनुदानासाठी कागदोपत्री प्रस्ताव कसा तयार करायचा, अनुदान कसे मिळवायचे, यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात अनेकांनी दुकानदारीच सुरू केली होती. त्यामुळेच अनुदानासाठी सर्वाधिक प्रस्ताव औरंगाबाद जिल्ह्यातून गेले.

एकाच दिवशी झाली होती झाडाझडती
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी आल्याने शंभर पथके तयार करून शहरातील 190, तर ग्रामीण मधील 35 अशा एकूण 225 मदरशांची एकाच वेळी तपासणी करण्यात आली होती. यामध्ये काही मदरशांचे पत्ते पथकाला सापडलेच नाहीत. तर काही ठिकाणी फक्त पाट्या लावल्या होत्या. अनुदान घेतले; मात्र तशा सुविधा मदरशात नव्हत्या. कुठे विद्यार्थ्यांचा पत्ता नव्हता. यानंतरही काही मदरसा चालकांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केल्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात एका व्यक्तीने स्वतः, नातेवाइकांच्या संस्था, मदरसे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याची माहिती तपासणीतून समोर होती. जिल्ह्यात एकाच दिवशी अचानक तपासणी करण्यात आल्यानंतर अनुदान लाटणाऱ्या अनेक मदरशांचे पितळ उघडे पडले. ना मदरसा, ना बोर्ड, ना विद्यार्थी, ना शिक्षक अशी स्थिती काही मदरशांची दिसून आली होती.

औरंगाबादेत पाचच मदरशांना अनुदान
31 मार्च 2017 रोजी अल्पसंख्याक विभागाने राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 155 मदरशांना 6 कोटी 21 लाख 76 हजार 113 रुपयांचे अनुदान मंजूर केले; मात्र यामध्ये औरंगाबादेतून सर्वाधिक तक्रारी आल्याने येथे प्रस्ताव दाखल केलेल्यांपैकी अनेकांना झटका देत फक्त पाचच मदरशांना 15 लाख 30 हजारांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अल्पसंख्याक विभागाच्या कडक निर्णयामुळे औरंगाबादमधील अनेकांना दणका बसला आहे. याउलट मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील मदरशांना अनुदान मिळाले आहे. मराठवाड्यातील एकूण 89 मदरशांना अनुदान मंजूर करण्यात आले.

राज्यात अनुदान मंजूर झालेले जिल्हे व मदरसा संख्या
जिल्हे..........................मदरसा संख्या.................अनुदान (रुपये)

मुंबई शहर........................03............................576000
मुंबई उपनगर.....................05............................2064325
ठाणे...............................03...........................836000
धुळे...............................01...........................325000
जळगाव...........................03...........................1130000
नंदुरबार............................02............................810000
सोलापूर...........................02.............................790000
सातारा.............................02............................735000
अमरावती..........................20............................8858400
औरंगाबाद.........................05............................1430000
जालना.............................25.............................10,000000
नांदेड..............................13.............................4830000
बीड...............................23...............................9970388
उस्मानाबाद........................01...............................370000
परभणी............................03...............................1006000
हिंगोली............................19...............................7868000
लातूर..............................03................................1015000
नागपूर.............................22................................9562000

Web Title: 5 madarasha subsidy in aurangabad