मराठवाड्यात सरासरी 57 टक्के पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

औरंगाबाद - जुलै महिन्यात दमदार आगमन करीत पावसाने मराठवाड्यातील दुष्काळ वाहून नेला. हे सातत्य मात्र ऑगस्ट महिन्यात काही राहिले नाही. ऑगस्ट महिन्यातील सोळा दिवसांत केवळ चारच दिवस पावसाचे ठरले, तर बारा दिवस कोरडे गेले. पावसाचा वाढलेला हा खंड ग्रामीण भागात पुन्हा एकदा पाणीटंचाईची चाहूल देऊ लागला आहे.
 
यंदा पावसाने उशिराने आगमन केले. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात दमदार सुरवात केली होती. जुलै महिन्यात मात्र जोरदार पाऊस झाला. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात असलेले निराशेचे चित्र बदलले. शेतात पिके बहरू लागल्याने शेतकरी खूष आहेत. मात्र, मागील बारा दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती पुन्हा दुष्काळाच्या खुणा दाखवू लागली आहे. चोवीस तासांत किमान सरासरी चार-पाच मिलिमीटर पाऊस पडल्यास पावसाचा दिवस म्हणून गणला जातो; अन्यथा कोरडा दिवस म्हणून नोंद केली जाते. मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात 1 तारखेला सरासरी 12.87 मिलिमीटर, 3 रोजी 10.61, 4 रोजी 4.75 आणि 6 रोजी 4.16 मिलिमीटर पाऊस पडला, तर उर्वरित दिवसांमध्ये पावसाने खातेच उघडले नाही.

अर्धा पावसाळा संपला; धरणे कोरडीच
मराठवाड्यात जून ते ऑक्‍टोबर कालावधीत पडणाऱ्या पावसाची वार्षिक सरासरी 779 मिलिमीटर आहे. 16 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 57.09 टक्के पाऊस पडला आहे. अर्धा पावसाळा संपला असून वार्षिक पावसाची अर्धी सरासरी पावसाने गाठलेली आहे. असे असले तरी बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत पन्नास टक्केही पाऊस पडलेला नाही. परभणी, औरंगाबाद जिल्हे काठावर आहेत. गेल्या बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मराठवाड्यातील जायकवाडी वगळता इतर मोठे प्रकल्प, तसेच मध्यम व लहान प्रकल्पात अद्यापही पाणी साचलेले नाही.