टंचाईग्रस्तांच्या संख्येत 59 गावांची भर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

76 ने वाढली टॅंकरची संख्या; 142 ने वाढले विहिरींचे अधिग्रहण
औरंगाबाद - मागील आठवड्याच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत 59 गाव वाड्यांची भर पडली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीच्या टॅंकरच्या संख्येतही 76 ने वाढ झाली असून, विहिरींच्या अधिग्रहणातही 142 विहिरींची भर पडली आहे.

76 ने वाढली टॅंकरची संख्या; 142 ने वाढले विहिरींचे अधिग्रहण
औरंगाबाद - मागील आठवड्याच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत 59 गाव वाड्यांची भर पडली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीच्या टॅंकरच्या संख्येतही 76 ने वाढ झाली असून, विहिरींच्या अधिग्रहणातही 142 विहिरींची भर पडली आहे.

गत आठवड्यात मराठवाड्यातील 321 गावं व 53 वाड्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत होते. आता हा आकडा 363 गावे व 70 वाड्यांवर पोहोचला आहे. या सर्व टंचाईग्रस्त गाव वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 472 टॅंकरची सोय करण्यात आली आहे. गत आठवड्यात टंचाईग्रस्त गाव वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 396 टॅंकरची सोय करण्यात आली होती. त्यामध्ये आता 76 टॅंकरची भर पडली आहे. गत आठवड्यात टॅंकरसाठी व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी 863 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. आता अधिग्रहित विहिरींची संख्या 142 ने वाढून 1005 वर पोचली आहे.

टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस भीषण होत चालली असून, आटते जलस्त्रोत अधिग्रहित विहिरींची संख्या वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईची तीव्रता सर्वाधिक असून, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड जिल्ह्यातही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गाव-वाड्या व टॅंकरची संख्या.
जिल्हा......गाव-वाड्या..........टॅंकर

औरंगाबाद...297.......324
जालना......42........49
परभणी........16.......16
हिंगोली........10.......02
नांदेड..........60........67
बीड..........05........05

औरंगाबाद जिल्ह्यात 24 टॅंकर वाढले
औरंगाबाद जिल्ह्यात गत आठवड्यात 300 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता या टॅंकरच्या संख्येत 24 टॅंकरची भर पडली आहे. 324 टॅंकरच्या साह्याने 297 गाववाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त 87 गावे गंगापूर तालुक्‍यातील आहेत. त्यापाठोपाठ सिल्लोड, वैजापूर, औरंगाबाद, खुल्ताबाद, कन्नड, पैठण, सोयगाव आदी तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावांचा समावेश आहे.

1005 विहिरींचे अधिग्रहण
मराठवाड्यातील 433 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरसह टंचाईग्रस्त गावांना थेट पाणीपुरवठा करण्यासाठी 1005 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी 763 व टॅंकरसाठी अधिग्रहित केलेल्या 249 विहिरींचा समावेश आहे.

Web Title: 59 village increase in water shortage