घृष्णेश्‍वर परिसर विकासासाठी 63 कोटींचा आराखडा मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जून 2016

औरंगाबाद : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्‍वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 63 कोटी 48 लाख 39 हजारांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

औरंगाबाद : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्‍वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 63 कोटी 48 लाख 39 हजारांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्‍तालयात सोमवारी (ता.20) पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास समितीची बैठक झाली. बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, इम्तियाज जलील, विभागीय आयुक्‍त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार, पर्यटन विभागाचे चंद्रशेखर जैस्वाल, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची उपस्थिती होती.
 

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने घृष्णेश्‍वर मंदिर परिसर नियमित, संरक्षित, प्रतिबंधित अशा तीन विभागांत विभागला आहे. त्यामुळे नियमित व संरक्षित क्षेत्रात भाविकांसाठी दर्शनरांग, पिण्याचे पाणी, भक्‍त निवास, वाहनतळ, मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई, आरोग्य केंद्र, स्वच्छतागृह आदींसह विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होऊन 63 कोटींचा आराखडा मंजूर करून शासनाला पाठविण्याचा निर्णय झाल्याची माहिती डॉ. दांगट यांनी दिली.