माध्यमे वाढली; पण संवाद संपला - शुभविलास प्रभू

माध्यमे वाढली; पण संवाद संपला - शुभविलास प्रभू

औरंगाबाद - संवादाची माध्यमे वाढली आणि परस्परांमधील संवाद संपला, अशी आजची स्थिती असल्याची खंत लेखक, वक्ते शुभविलास प्रभू यांनी शनिवारी (ता. १२) व्यक्त केली. बहुतांश लोक दोन कान असूनही कमी ऐकतात, एक तोंड असूनही जास्त बोलतात. याउलट ‘कमी बोला, जास्त ऐका;’ तर बऱ्याच समस्या आटोक्‍यात येतील, असा यशाचा मंत्रही त्यांनी दिला.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज इन इंडिया (सीआयआय) व इस्कॉनच्या पुढाकाराने शनिवारी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सीएमआयए, मसिआ, एनआयपीएम, औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, महात्मा गांधी मिशन, वास्तुविशारद संस्था, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन या सर्व संस्थांच्या सहकार्याने एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सी. पी. त्रिपाठी, श्रीराम नारायणन, सतीश कागलीवाल, अंकुशराव कदम, राजन नाडकर्णी, डॉ. रंजलकर, डॉ. हिमांशू गुप्ता आदींची उपस्थिती होती. श्रीराम नारायणन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील देशपांडे यांनी वक्‍त्यांचा परिचय करून दिला. सी. पी. त्रिपाठी यांच्या हस्ते शुभविलास प्रभू यांचे शाल, सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. 
‘नेतृत्वसंस्कृतीचा विकास’ या विषयावर औघवत्या शैलीत शुभविलास प्रभू यांनी सादरीकरण केले. आपल्या उत्स्फूर्त भाषणात ते म्हणाले, ‘‘हुशार लोकांना यशस्वी समजले जाते; पण हे लोक बहुतांशी एकटे असतात.

हुशारीबरोबरच माणुसकी आणि चांगली वर्तणूक महत्त्वाची. कर्ण कौशल्यवान होता; पण अर्जुन त्याच्याठायी असलेल्या सद्गुणांनी मोठा ठरला. हुशारी यशाचे एक, दोन, तीन दरवाजे उघडू शकते; पण अंतिम यश हे चांगल्या गुणांचा समुच्चय असणाऱ्याला मिळते.’’

समाजातील अदृश्‍य नेत्त्वाची गरज सांगताना ते म्हणाले, ‘‘सामर्थ्य मिळविणे सोपे आहे; पण अनेकांना सामर्थ्यवान बनविणे अवघड आहे. आपण आपल्या पायावर उभे राहणे सोपे आहे. इतरांना त्यांच्या पायावर उभे करणे अवघड आहे. नेते जोवर आपल्या स्थानी आहेत, तोवर परिस्थिती निभावून नेण्यास सक्षम ठरतात; मात्र पुढील पिढीत नेतृत्वगुण हस्तांतरित करता येत नाहीत. मग त्यासाठी बाहेरून प्रशिक्षक बोलवावे लागतात, ही आजचीही वस्तुस्थिती आहे. स्वतः पाठीमागे राहून अनुयायांना पुढे करणारे लोक राहिले नाहीत, ही शोकांतिका आहे.’’ आपल्या या म्हणण्याला रामायण, महाभारतातील संदर्भ देऊन त्यांनी म्हटले, की समुद्र उल्लंघून जाण्याच्या आणि सीताशोधाची मोहीम फत्ते करण्याच्या हनुमानाच्या शक्तीची जाणीव करून देण्याचे काम जांबुवंताने केले. रामायणाच्या पानापानांवर हनुमानाच्या पराक्रमाचे वर्णन आहे. हनुमान रामायणाचा हिरो असला, तरी हनुमानाचा हिरो जांबुवंत आहे; तसेच महाभारताचा पराक्रमी वीर भीम ठरला; पण गर्वहरण करून त्याला प्रेरणा देणारे हनुमान होते. हे खरे अदृश्‍य नेते.

आजच्या कॉर्पोरेट जगात एखादी गोष्ट आपण करू शकत नसू, तर कुणालाच ती करता येऊ नये, अशी भूमिका बजाविणारे लोक पाहायला मिळतात, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com