जिल्ह्यातील ट्रामा सेंटरच कोमात

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 29 जून 2017

रुग्णांची खासगी रुग्णालयात धावाधाव, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

औरंगाबाद - अपघातग्रस्तांसह अन्य रुग्णांना अत्यावश्‍यक सुविधा तातडीने जवळच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी २० खाटांचे जिल्ह्यात सहा ट्रामा सेंटर मंजूर आहेत. मात्र, सरकारी यंत्रणेतील अभाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळकाढू धोरण अशा प्रतापांमुळे हे सेंटरच कोमामध्ये गेल्यागत अवस्था झाली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून, त्या-त्या परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालये गाठण्याची वेळ नातेवाइकांवर आली आहे.

रुग्णांची खासगी रुग्णालयात धावाधाव, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

औरंगाबाद - अपघातग्रस्तांसह अन्य रुग्णांना अत्यावश्‍यक सुविधा तातडीने जवळच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी २० खाटांचे जिल्ह्यात सहा ट्रामा सेंटर मंजूर आहेत. मात्र, सरकारी यंत्रणेतील अभाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळकाढू धोरण अशा प्रतापांमुळे हे सेंटरच कोमामध्ये गेल्यागत अवस्था झाली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून, त्या-त्या परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालये गाठण्याची वेळ नातेवाइकांवर आली आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्या गावानजीक असलेल्या सरकारी रुग्णालयातच सुविधा मिळाव्यात, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये सुरू केलेली आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून अनेक रुग्णालयात डॉक्‍टर असतील तर यंत्रसामग्री नाही. यंत्रसामग्री असेल तर डॉक्‍टर नाहीत आणि डॉक्‍टर, यंत्रसामग्री असेल तर इमारतच नाही, अशीच काहीशी अवस्था सध्या ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयाची झालेली आहे. अशा स्थितीमुळे अनेकदा खिशात पैसे नसले तरी उसनवारी करून खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे किंवा मोठ्या शहरातील सरकारी रुग्णालये गाठावी लागत आहेत. 

अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यातील वैजापूर, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, अजिंठा (ता. सिल्लोड), पाचोड (ता. पैठण) या सहा ठिकाणी ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयास जोडून ट्रामा सेंटर मंजूर करण्यात आले. ३० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास जोडून स्वतंत्र २० खाटांचे हे ट्रामा सेंटर असेल, असा नियमानुसार ठरलेले आहे. मात्र, त्यापैकी वैजापूर, सिल्लोड व गंगापूर या तीन ठिकाणीच सध्या सुविधा उपलब्ध असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. अद्यापही येथे सुविधाच उपलब्ध नसल्याची बाब समोर आलेली आहे. तर उर्वरित पाचोड, अजिंठा आणि कन्नड येथील सेंटर नावालाच उरले आहेत. साधारणत: सहा वर्षापूर्वी अजिंठा येथे ट्रामा सेंटरला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत उभी केली. मात्र, या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वीच पावसाळ्यात इमारतीला लागणारी गळती, अद्यापही विजेचे मीटरच बसविण्यात आलेले नसून फरशीला पॉलिश केलेले नाही, अशा अवस्थेत इमारत ताब्यात कशी घेणार, असा सवाल आरोग्य विभागाने केला आहे. पाचोडची इमारत पाच वर्षांपूर्वीच बांधून तयार आहे. मात्र, विजेच्या पुरवठ्यासाठी मीटर बसविलेले नाही. फरशा गळून पडल्या आहेत. शिवाय इमारतीचे कामही चांगले झाले नसल्याची टिप्पणी आरोग्य विभागाने केली आहे; तर कन्नड येथील सेंटरसाठी दीड वर्षापासून बांधकाम सुरूच आहे. ते कधी पूर्ण होईल, याबद्दल निश्‍चित माहिती समोर येत नाही. त्यामुळे सहापैकी तीन ट्रामा सेंटर नावालाच उरले आहेत. केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकलपणामुळे गरजूंना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. 

ट्रामा सेंटरसाठी आवश्‍यकतेनुसार पाचोड, अजिंठा येथे बांधकाम करण्यात आले; तर कन्नड येथील बांधकाम सुरूच आहे. मात्र, इमारतीला गळती, मीटर नसणे, फरशीची साफसफाई नसणे, अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व ट्रामा सेंटर कार्यान्वित झाल्यास घाटी रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक.