रस्त्यावर झोपलेल्या तीन कामगारांना वाहनाने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

धर्माबादजवळील घटना; मृतांच्या नातेवाइकांचा पोलिसांना घेराव

धर्माबादजवळील घटना; मृतांच्या नातेवाइकांचा पोलिसांना घेराव
धर्माबाद - तेलंगणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झोपलेल्या तीन कामगारांना वाहनाने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आलूर (ता. धर्माबाद) येथे शनिवारी (ता. एक) पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अनिल सायबू बैरमवाड (वय 16), सचिन लक्ष्मण पाथलवाड (18), मोइनोद्दीन (45) अशी तिघांची नावे आहेत.

मृत कामगारांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन पोलिसांना घेराव घातला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रत्येकी दीड लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आले.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तेलंगणाला जोडणाऱ्या बेल्लूर रस्त्याचे 2015 पासून काम सुरू आहे. या योजनेतून आलूर गावानजीक रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून, जी. जी. कंस्ट्रक्‍शन कंपनी ते गेल्या तीन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने करीत आहे. चार किलोमीटरच्या या कामासाठी एवढा कालावधी का लागत आहे, याबाबतचे कोडे उलगडलेले नसले तरी दरम्यानच्या काळात अपघातांत अनेक वाहनचालकांना अपंगत्व आले आहे. याच अपूर्ण रस्त्याने तीन कामगारांच्या बळी घेतला. आलूर येथील काम संपवून हे कामगार रात्री झोपले होते. उकाडा, डासांच्या त्रासामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्याचा आधार घेतला. मध्यरात्री दोननंतर अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. त्यातच तिघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच सकाळी अनेकांनी आलूरकडे धाव घेतली. तिघे कामगार कुंडलवाडीचे असल्याने त्यांचे नातलग घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह घेऊन असताना नातेवाइकांनी विरोध केला आणि तब्बल सहा तास त्यांनी पोलिसांना घेराव घातला. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे नातेवाइकांचे म्हणणे होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक अंगत सुडके, कुंडलवाडीचे नगरसेवक कोंडावार यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बांधकाम कंपनीने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दीड लाख रुपये देण्याचे सायंकाळी जाहीर केल्यानंतरच उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हलविण्यात आले.