उड्डाणाच्या तयारीत असतानाच विमानात बिघाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

औरंगाबाद - औरंगाबाद - मुंबई - दिल्ली जेट एअरवेजच्या विमानात मंगळवारी (ता. २९) बिघाड झाला. विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच, बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र विमान बिघाडाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ९३ प्रवाशांना मनस्ताप झाला. 

औरंगाबाद - औरंगाबाद - मुंबई - दिल्ली जेट एअरवेजच्या विमानात मंगळवारी (ता. २९) बिघाड झाला. विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच, बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र विमान बिघाडाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ९३ प्रवाशांना मनस्ताप झाला. 

जेट एअरवेजचे औरंगाबाद - मुंबई - दिल्ली हे विमान रोज सकाळी ६.५० वाजता निघते. मंगळवारी सकाळी विमानात ९३ प्रवासी बसले. त्यानंतर विमान उड्डाणाच्या तयारीत होते. सुरवातीला विमानाची पुशबॅक प्रक्रिया सुरू असतानाच, इंजिमधून आवाज येत असल्याचे पालयटच्या लक्षात आले. त्याने तातडीने विमानाच्या अभियंत्यांना माहिती दिली, अभियंत्यांसह तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने, विमान उड्डाण घेणे शक्‍य नाही हे लक्षात आले. या सर्व प्रक्रियेत जवळपास एक तास गेला होता. तोपर्यंत प्रवाशांना विमान उड्डाण का घेत नाही, याची कल्पना नव्हती. अखेर जेट एअरवेजतर्फे विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर मात्र प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. विमानात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासह विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, एमआयडीसीचे अधिकारी सोहम वायाळ, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार नारायण कुचे, सभागृह नेता विकास जैन यांच्यासह ९३ प्रवासी होते. शहरातील विकासकामांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी महापौर व महापालिकेचे पदाधिकारी मुंबईला निघाले होते; तर विभागीय आयुक्तही प्रशासकीय बैठकीसाठी मुंबईला निघाले होते.

प्रवाशांना मनस्ताप 
विमान उड्डाण करू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्याची मागणी केली; मात्र विमानतळावर दिवसभर धावपट्टी बंद असते. त्यामुळे दुसरे विमान बोलावणे शक्‍य नसल्याचे जेट एअरवेजने जाहीर केल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. विमानतळावर एक ते दीड तास गोंधळ निर्माण झाला होता.

विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली; मात्र त्यांची जेट एअरवेजने पूर्ण व्यवस्था केली. चाळीस प्रवासी संध्याकाळच्या विमानाने रवाना झाले. काही प्रवासी पुणे मार्गे रवाना झाले. काहींची हॉटेलात राहण्याची व्यवस्था केली होती. प्रवाशांना सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. 
- अहमद जलील, अधिकारी, जेट एअरवेज.

Web Title: aeroplane problem