निवडणुका जवळ येऊनही दहा दिवसांनी पाणी! 

निवडणुका जवळ येऊनही दहा दिवसांनी पाणी! 

लातूर - महापौर व स्थायी समितीच्या सभापतींसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. पालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने पदाधिकाऱ्यांचाही आग्रह आहे; मात्र प्रशासकीय समन्वयाचा अभाव आणि वारंवार व्यत्यय येत असल्याने सध्या दहा दिवसांनी पाणी दिले जाते. त्यातही वेळा आणि दिवसही अनिश्‍चित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

मागील वर्षी लातूरकरांनी अभूतपूर्व पाणीटंचाई अनुभवली. महापालिकेचे ढिसाळ नियोजन आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे लातूरला मिरजेहून रेल्वेगाडीने पाणी आणावे लागले. त्यातही ठराविक भागांना पाणी देऊन इतरांना डावलले गेले. उच्चभ्रू वस्तीच्या नावाखाली विशिष्ट लोकांना पाणी न देण्याचे पालिकेचे धोरण होते. तेच धोरण सध्या पालिका प्रशासन राबवत असून, मागास वस्त्यांसह झोपडपट्टीला पाणी देऊन ठराविक भागाला डावलले जात आहे. महापौर दीपक सूळ, उपमहापौर चांदपाशा घावटी आणि स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे हे आठवड्यातून दोन वेळा पाणी देणार असल्याचे सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी वारंवार बैठका घेऊन नियोजन केले. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पदाधिकाऱ्यांनी केलेले नियोजन अमलात येणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांचे नियोजन फोल ठरविण्याचे प्रयत्न होत असून, वारंवार पाणीपुरवठा विस्कळित केला जात आहे. परिणामी पुढाऱ्यांनी दोन-चार दिवसांनी पाणी देण्याच्या वल्गना करूनही दहा दिवसांनीसुद्धा पाणी मिळत 
नसल्याची स्थिती आहे. 

लातूरला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण काठोकाठ भरलेले आहे. त्यात पुढील किमान चार वर्षे पाणीपुरवठा होईल, एवढा साठा आहे. साई व नागझरी बंधाऱ्यात भरपूर साठा शिल्लक आहे; मात्र मांजरा धरणातून पूर्ण क्षमतेन उपसा केला जात नाही. साई व नागझरीचे पाणी शेतकरी उपसा करतात; पण महापालिकेला पुरेसा उपसा करता येत नसल्याची स्थिती आहे. परिणामी धरणात पाणी असूनही नागरिकांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नाही. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे अपेक्षित आहे; मात्र ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत व्यस्त असल्याने समस्या वाढत आहे. 

नेमके काय घडत आहे? 
महापालिकेचे दर आठ दिवसांनी पाणी देण्याचे सध्याचे नियोजन आहे; परंतु महिनाभरापासून ठरलेल्या दिवशी पाणी येईल? याची अभियंतेसुद्धा खात्री देत नाहीत. मांजरा धरणावर नवीन रोहित्र बसविल्याचे सांगितले जाते; मात्र साधारणतः तीनपैकी एकच वीजपंप चालू असतो. हरंगूळच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुरेसे पाणी उपलब्ध नसते. तेथून शहरात पाणी येताना जीवन प्राधिकरण, आर्वी, गांधी चौक व विवेकानंद चौकातील जलकुंभात नियोजनाशिवाय पाणी घेतले जाते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे व्हॉल्व्ह व जलवाहिन्यांची गळती सुरूच आहे. पाणी योजनेतील अभियंते व कर्मचाऱ्यांत पुरेसा समन्वय नाही. काही कर्मचारी त्यांच्या नेमणुकीच्या जलकुंभात परस्पर पाणी वळवून घेतात. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळित 
आहे. नागरिक सहन करीत असल्याने याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 

""मांजरा धरणातून पाणी उपसा करणाऱ्या पंपांसाठी लागणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने सोमवारी (ता. 13) शहराला अपेक्षित पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणीपुरवठा नियोजनातील त्रुटी लक्षात घेऊन दुरुस्ती केली जाणार आहे. कुठल्याही भागातील नागरिकांना टार्गेट केले जात नाही. काही अडचणी उद्‌भवल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधून निराकरण करावे.'' 
-रमेश पवार, महापालिका आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com