कामगाराच्या मुलाने केले वडिलांचे स्वप्न पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

औरंगाबाद - कंपनीत कामावर जाण्यासाठी घरातून पहाटे चार वाजता बाहेर पडणाऱ्या वडिलांना अधिकारी व्हायचे होते; मात्र बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना ते शक्‍य झाले नाही; पण त्यांच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. आता त्याची नगरपरिषद मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे. ही यशोगाथा आहे ती अजय मुकुंद साबळे याची.  

मूळचे सोलापूर येथील मुकुंद साबळे केवळ ३०० सोबत रुपये घेऊन औरंगाबादमध्ये आले. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील बजाज कंपनीत मेंटनन्स विभागात ते काम करतात. कंपनीच्या पहिल्या शिफ्टसाठी ते घरातून ४ वाजताच डबा घेऊन बाहेर पडतात आणि थेट संध्याकाळी ५ वाजता परततात. त्यांची पत्नी राज्यशास्त्रात एम.ए. आहे; पण मुलांसाठी त्यांनी नोकरीचा विचार सोडून दिला. त्यांच्या संस्कारांमुळेच अजयने एमपीएससीचा गड सर केला. अजय म्हणाला, ‘‘मी बारावीत असताना माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी कर्ज काढले. अनंत अडचणींचा सामना केला.

त्यांनी कधी स्वत:ला लवकर नवीन कपडे घेतले नाहीत; मात्र आम्हा भावंडांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिले नाही. आईनेही चांगले संस्कार दिले. या संस्कारांनी जीवनात फार मोठा बदल केला. मुलांनी अधिकारी व्हावे हे वडिलांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण केल्याचा आनंद आहे. माझे शिक्षण बीई, एमएसडब्ल्यू झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होतो. दुसऱ्या प्रयत्नात एमपीएससी पास झालो. शिक्षक असलेला मोठा भाऊ विनायक व लहान भाऊ नीरज यांच्याकडून स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली. माझ्या यशाचे श्रेय आई, वडील, भाऊ आणि मार्गदर्शकांना देतो,’’ अशी भावना त्याने व्यक्‍त केली.

Web Title: ajay sabale nagarparishad chief officer success motivation