'पीआरसी'च्या सरबराईसाठी शिक्षकांकडून पठाणी वसूली !

योगेश फरपट
शनिवार, 27 मे 2017

पीआरसीच्या नावावर कोणताही निधी अकोला तालुक्यातील केंद्रप्रमुखाकडून तसेच शिक्षण विभागाकडून मागविण्यात आला नाही. जर तसे हाेत असेल तर थेट आमच्याकडे लेखी तक्रार करावी.
- रतन पवार, गटशिक्षणाधिकारी, अकोला

दोन महिन्यांपासून पगार नाही, कोठून देणार पैसे, शिक्षक ‘अर्थ’संकटात

अकोलाः ‘खडू’ सुध्दा स्वतःच्या पैशाने आणणाऱ्या शिक्षकांवर आता पंचायत राज समितीच्या सरबराईसाठी निधी गोळा करण्याची जबाबदारी आली आहे. दस्तरखुद्द केंद्रप्रमुखांकडूनच आपआपल्या तालुक्यातील शिक्षकांकडून प्रत्येकी तिनशे रूपये गोळा करण्याची सूचना मिळाली असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. तर दुसरीकडे दोन महिन्यांपासूनचे वेतन न मिळालेल्या शिक्षकांना तिनशे रूपये द्यायचे तरी कुणासाठी व कशासाठी? हा प्रश्न पडला आहे.

पंचायत राज समिती जून महिन्यात १,२ व ३ तारखेला जिल्ह्यात आहे. या समितीचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलाच धाक असताे. ही समिती कशात त्रुटी काढेल व आपला गेम होवून जाईल ही भिती मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यासह सर्वच विभागप्रमुखांना राहते. त्यामुळे पंचायत राज समितीच्या सरबताईत कुठलीही कमतरता राहता कामा नये याची दक्षता जिल्हा परिषद प्रशासन घेते. समितीचा दौरा चार दिवसावर आला असताना अचानक शुक्रवारी (ता.२६) दुपारी २ ते ६ वाजेदरम्यान अकोला, बार्शीटाकळी, अकाेट व पातूर तालुक्यातील शिक्षकांना खुद्द केंद्रप्रमुखांनीच प्रत्येकी ३०० रूपये जमा करण्याची सूचना केली. पीआरसी दौरा अन् शिक्षकांचा काय संबध, असा प्रश्न अनेकांनी केला असता ‘त्या’ शिक्षकांना चांगलीच तंबी बसली. या विषयाची चर्चा शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संध्याकाळी रंगली होती.

शिक्षक पगाराविना
जिल्हा परिषद अकोलाअंतर्गत ३९०० शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे पगार आजच्या तारखेपर्यंत झालेले नाहीत. शिक्षक समन्वय समितीने २१ मे रोजी लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी २५ मे रोजी पगार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू आज (ता.२६) समन्वय समितीने भेट घेतली असता सोमवारी बघू असे उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रशासनाला माहित नसेल पण शिक्षकांनी जिल्हा बॅंकेकडून ओव्हर ड्राफ्ट (ओडी) घेतली आहे, तसेच गृहकर्ज घेतले आहे. प्रत्येकाला ५७५ दंड पडतो. असे १७ लाख रूपये नाहक व्याज शिक्षकांच्या माथी पडते. एवढा मोठा आर्थिक फटका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पडत आहे. दरवेळेस पगार देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शिक्षकांना सुचेनासे झाले आहे.

या संघटना आक्रमक
पगाराच्या मागणीसाठी साने गुरूजी शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, शिक्षक सेना, बहूजन शिक्षक महासंघ, शिक्षक परिषद (प्राथमिक), उर्दु शिक्षक संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख संघटना, शिक्षक समिती आंदाेलनाच्या तयारीत आहे.

ताज्या बातम्याः