बेफाम वाहन चालवताय, सावधान!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

औरंगाबाद - बेफाम वाहन चालवताय, सावधान! तुमच्यावर वाहतूक पोलिसांची अर्थातच स्पीडगनची नजर आहे. तुमच्या वाहनांचा वेग आता स्पीडगन मोजत असून, प्रतितास चाळीस किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर शहर पोलिस दलाला स्पीडगन मिळाल्या आहेत.

औरंगाबाद - बेफाम वाहन चालवताय, सावधान! तुमच्यावर वाहतूक पोलिसांची अर्थातच स्पीडगनची नजर आहे. तुमच्या वाहनांचा वेग आता स्पीडगन मोजत असून, प्रतितास चाळीस किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर शहर पोलिस दलाला स्पीडगन मिळाल्या आहेत.

शहराची वाहतूक समस्या बिकट आहे. बेफाम वेगामुळे झालेल्या अपघातांत अनेक जीव गेले. मुख्य रस्त्यांवर वेगामुळे जीव मुठीत धरून जावे लागते. "सकाळ'ने यासंबंधी वेळावेळी वृत्त प्रकाशित करून अत्याधुनिक वाहतूक तंत्राची गरज असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. यासंबंधी पोलिस विभागाने प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे पाठवला होता. गत काही दिवसांपूर्वीच शहर पोलिस दलाला तीन स्पीडगन मिळाल्या. गुरुवारी (ता. चार) या स्पीडगनचे पोलिस उपायुक्त दीपाली घाडगे यांनी उद्‌घाटन केले. त्यानंतर लगेचच वेगवान वाहनांवर कारवाईला सुरवातही झाली. शहर पोलिस दलाला स्पीडगनची अत्यंत आवश्‍यकता होती. अनेक अपघात वेगामुळेच घडतात. आता स्पीडगनमुळे शहर व बीडबायपासची वाहतूक एकाच वेगाने जाण्यास मदत होणार आहे. सहायक वाहतूक आयुक्त सी. डी. शेवगण, निरीक्षक अविनाश आघाव, जारवाल यांच्यासह वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

असे चालेल कार्य...
नियोजित स्थळी स्पीडगन ठेवण्यात येतील. त्यानंतर ठराविक अंतरावरील पुढच्या स्थळावर वाहतूक पोलिस तैनात राहतील. चाळीसपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांचे छायाचित्र हे स्पीडगनद्वारे कैद होऊन त्याची प्रिंटही देतील. स्पीडगन हाताळणारे अधिकारी लगेचच बेफाम वाहनांची माहिती वॉकीटॉकीवरून पुढच्या स्थळावर तैनात पोलिसांना देतील. त्या बेफाम वाहनांना अडवून त्यांच्यावर तैनात पोलिस कारवाई करतील. या उपकरणाने दिलेली प्रिंट न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते.

...तर जीवही वाचेल
डिजिटल तंत्राचा अवलंब केल्यामुळे वेगवान वाहतुकीला चाप बसून जीवही वाचतील. विशेषत: अपघात कमी होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकेल. विशेषत: रात्रीच्या वेळी बेफाम वाहतूक होते, बहुतांश अपघात या वेळातही घडतात आणि वाहने पसार होतात. अशा वेळी या तंत्राचा उपयोग होऊ शकेल.

स्पीडगनची वैशिष्ट्ये
दीडशे मीटरवरून नंबर प्लेटचा फोटो मिळतो.
दोन किलोमीटर दूर असलेल्या वाहनांचा वेग मोजता येतो.
प्रतितास साडेतीनशे वेगातील वाहनांचा वेग मोजते.
लेझर गनला आयएसपी संस्थेची मान्यता.
एकदा लेझर गन सुरू झाल्यास सलग चार तास वापर करता येतो.
चार बाय सहा कलर फोटो काढू शकतो, त्यात वेळ, तारीख व वेग नमूद होतो.

सध्या वाहनांचा सरासरी वेग (प्रतितास)
* दुचाकी : चाळीस ते साठ
* कार व मध्यम वाहने : साठ ते ऐंशी
* जड वाहने : चाळीस ते साठ
* खासगी ट्रॅव्हल्स : ऐंशीपेक्षा अधिक
* तीनचाकी : पन्नास ते साठ

आता वाहनांवर असेल स्पीडगनची नजर
वाहतूक विभागाला मिळाल्या तीन स्पीडगन
भरधाव वाहन, अपघातांना बसेल चाप

Web Title: alert for vehicle drive