लातुरात परिवर्तन, महापालिकेत 'कमळ' फुलले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या लातूरकरांनी अखेर सक्षम पर्याय मिळताच काँग्रेसची साथ सोडत भाजपला जवळ केले. एकही नगरसेवक नसलेल्या भाजपला लातूरकरांनी बहुमतासह सत्ता दिली. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. एमआयएम, शिवसेना व इतर पक्षांचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाला.

लातूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न, त्यावरून काँग्रेससह विरोधकांनी राज्यभरात काढलेली संघर्ष आणि बच्चू कडू यांची आसूड यात्रा या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लातूरसह परभणी व विदर्भातील चंद्रपूर महापालिका निवडणुकीत मतदारांनी परभणी वगळता लातूर आणि चंद्रपुरात भाजपला स्पष्ट बहुमतासह सत्ता दिली. दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर काँग्रेसचा लातुरात झालेला हा सर्वांत मोठा पराभव म्हणावा लागेल. 'परिवर्तन तर होणारच' हा शब्द भाजपने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली खरा करून दाखवला.

महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या लातूरकरांनी अखेर सक्षम पर्याय मिळताच काँग्रेसची साथ सोडत भाजपला जवळ केले. एकही नगरसेवक नसलेल्या भाजपला लातूरकरांनी बहुमतासह सत्ता दिली. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. एमआयएम, शिवसेना व इतर पक्षांचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाला. 

महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भाजपने आमदार अमित देशमुख यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण केले होते. जिल्ह्यातल्या दोन नगरपालिका आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेची सत्ता मिळवत त्यांनी काँग्रेसला धोक्‍याचा इशारा दिला होता. पण लातूर आमचेच, तुम्ही बाहेरचे, तुमचे इथे काय काम असे म्हणत त्यांनी भाजपला फारसे गांभीर्याने घेतले नाही. पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि लातूरच्या जनतेने यावेळी काँग्रेसला गांभीर्याने न घेण्याचा निर्धार केला होता हे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

गेल्या महापालिकेत एकही नगरसेवक नसलेल्या भाजपला 36 जागांसह लातूरकरांनी बहुमत दिले. तर 49 वर असलेली काँग्रेस 16 ने घसरून 33 जागांवर स्थिरावली. त्यामुळे महापालिकेत त्यांना आता विरोधकांची भूमिका बजावावी लागणार आहे. लातूर महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम, रिपाइं, अपक्षांचे अस्तित्वच दिसले नाही. त्यामुळे महापालिकेची लढाई केवळ काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच झाली. मोदी लाट आणि निलंगेकरांच्या नेतृत्वाला साथ लोकसभा-विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत निर्माण झालेली मोदी लाट दिल्ली ते अगदी गल्लीपर्यंतच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये कायम असल्याचे वारंवार सिद्ध झाले. महापालिका निवडणुकीतील विजयाने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

लातूर जिल्ह्यात देशमुख यांच्या विरोधात उभे राहणारे नेतृत्वच मिळाले नाही, किंवा ते निर्माणच होऊ दिले गेले नाही. संभाजी पाटील निलंगेकरांच्या रुपाने अमित देशमुख यांच्या विरोधात खंबीर नेतृत्व उभे राहिले. सक्षम पर्याय मिळताच लातूरकरांनी प्रथम नगरपालिका, जिल्हापरिषद आणि आता महापालिकेच्या माध्यमातून परिवर्तनाला पसंती दिली. दुष्काळात पाण्यासाठी लातूरकर टाहो फोडत असताना अमित देशमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पाणी हा लातूरकरांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न आहे, तो सोडवला तर जिल्ह्यातील देशमुखशाही संपवणे अवघड नाही हे भाजपने हेरले होते. 'जलदूत'च्या माध्यमातून मिरजेचे पाणी रेल्वेने लातुरात आणून भाजपने तेव्हा 'मौका देख के चौका लगावला' त्याचे फळ सातत्याने त्यांना मिळत गेले. महापालिकेतील विजयाने जिल्ह्यात परिवर्तन तर घडलेच शिवाय काँग्रेसमुक्त लातूरचे स्वप्न देखील साकार झाले. 'परिवर्तन' विरुद्ध 'होय हे आम्ही केले' या कॅम्पेनिंगमध्ये देखील भाजपने काँग्रेसवर कुरघोडी केली. 'होय हे आम्ही केले' याच कॅचलाईनचा वापर करत भाजपने लातूर शहरातील वाईट गोष्टीचे श्रेय देखील चतुराईने काँग्रेसच्या माथी मारले. त्याचा देखील चांगला परिणाम मतदानातून दिसून आला. 

काँग्रेस विरोधातील नाराजी मतपेटीतून व्यक्त 
गेल्या पाच वर्षात काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचा लातूरकरांना उबग आला होता. सर्वसामान्य लातूरकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न सोडवतांना सत्तेतील लोकप्रतिनिधी व प्रशानातील अधिकाऱ्यांचा बेफकरीपणा काँग्रेसला या निवडणुकीत चांगलाच भोवला. कचरा, पाणी, रस्ते आणि पथदिव्या सारखे मुलभूत प्रश्‍न काँग्रेसला सोडवता आले नाही. त्यासाठी लातूरकरांना वारंवार रस्त्यावर उतरावे लागले याचा राग देखील मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला.

निवडणुकीत उमेदवारी देतांना घराणेशाही, आणि त्याच त्या जवळच्या लोकांना माथी मारण्याच्या प्रकाराला देखील लातूरकर वैतागले होते. 'हम करे सो कायदा' समजणाऱ्या अमित व दिलीपराव देशमुख या काका-पुतण्याला मतदारांनी यावेळी दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या माजी महापौर खानापुरे यांच्या पराभवातून ते स्पष्ट झाले. केवळ निवडणुका आल्या की मुंबई सोडून लातूरात यायचे आणि विकासाच्या गप्पा मारत मते मिळवायची ही परंपरा यंदा मोडीत निघाली. पैशाच्या जोरावर प्रचारात आघाडी, सभेला गर्दी आणि रोड शो ला मिळालेल्या प्रतिसादामुळे काँग्रेस गाफील राहिली. मतदारांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले नाही, परिणामी त्यांना सत्ता गमवावी लागली. मतदानाच्या एक दिवस आधीच भाजप उमेदवाराच्या पतीवर हल्ला करून त्याच्या अंगावर उकळता चहा टाकल्याचा प्रकरणाने देखील भाजपला सहानुभूती मिळाली. लातुरातील गुंडगिरी हे देखील काँग्रेसच्या पराभवातील अनेक कारणांपैकी एक समजले जाते. दुष्काळात लातूरकरांना पाण्याच्या थेंबा थेंबासाठी झगडावे लागले याची आठवण मतदारांनी ईव्हीएमचे बटन दाबतांना ठेवली एवढे मात्र निश्‍चित. 

राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम निष्भ्रम 
काँग्रेस विरुद्ध भाजपच्या युद्धात राष्ट्रवादी, शिवसेना व एमआयएम या तिन्ही पक्षांना लातूरच्या मतदारांनी साफ नाकारले. एमआयएमने असदोद्दीन ओवेसींच्या शहरात दोन सभा घेतल्या. पण निवडणुकी आधीच पक्षात मोठ्या झालेल्या फाटाफुटीने एमआयएमची दखल कुणीच घेतली नाही. त्यामुळे त्यांना भोपळाही फोडता आला नाही.

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेकजण काँग्रेसमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार मिळणे अवघड झाले होते. मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या तरी मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्यावेळी 13 जागांवर असलेली राष्ट्रवादी या निवडणुकीत केवळ एक जागा जिंकू शकली. शिवसेनेचा प्रवास देखील 6 वरुन शून्य असा उलट्या दिशेने सुरु झाला आहे. एकंदरीत घराणेशाही, एकाधिकारशाही, दादागिरी, भ्रष्ट कारभार व पैशाच्या राजकारणाला कंटाळलेल्या लातूरकरांनी नवा पर्याय निवडला आहे.

Web Title: Analysis of BJP victory in Latur Municipal Corporation election