लष्कराच्या पथकाची रिक्षाचालकांना मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुनःनोंदणी, फिटनेससाठी आलेल्या रिक्षाचालकांनी जागा नसल्याने लष्कराच्या जागेवर रिक्षा उभ्या केल्या होत्या. मात्र, रिक्षाचालकांना लष्कराच्या काही जवानांनी मारहाण करून हुसकावून लावले. शिवाय रिक्षाची हवा सोडून दिली. हा प्रकार मंगळवारी (ता. 21) सकाळी अकराच्या सुमारास घडला. 

औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुनःनोंदणी, फिटनेससाठी आलेल्या रिक्षाचालकांनी जागा नसल्याने लष्कराच्या जागेवर रिक्षा उभ्या केल्या होत्या. मात्र, रिक्षाचालकांना लष्कराच्या काही जवानांनी मारहाण करून हुसकावून लावले. शिवाय रिक्षाची हवा सोडून दिली. हा प्रकार मंगळवारी (ता. 21) सकाळी अकराच्या सुमारास घडला. 

परिवहन नियमाप्रमाणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रत्येक वर्षी पुनःनोंदणी व फिटनेस सर्टीफिकेट घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी रोज मोठ्या प्रमाणावर रिक्षा येतात. पूर्वी हे काम आरटीओच्या आवारात केले जात होते. मात्र, कारवाईतील जप्तीच्या वाहनांची संख्या वाढल्याने आरटीओच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे सध्या आरटीओ कार्यालयाच्या समोर लष्कराच्या जागेवर वाहने उभी करून रोज निरीक्षकांमार्फत वाहनांची तपासणी केली जाते. मंगळवारी सकाळी दहापासून या मैदानावर अनेक रिक्षा पुनःनोंदणीसाठी उभ्या होत्या. मात्र, अकराच्या सुमारास अचानक लष्कराच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक आले. या पथकाने रिक्षाचालकांना धक्काबुक्की केली. काही रिक्षांच्या हवा सोडून दिल्या. सर्व रिक्षाचालकांना पिटाळून लावले. लष्कराच्या अचानक झालेल्या या कारवाईने चालक भयभीत झाले. जवळपास अर्धा तासाच्या गोंधळानंतर लष्कराचे पथक निघून गेले. त्यानंतर पुन्हा रिक्षा आणि नोंदणीसाठी आलेले ट्रॅक्‍टर त्याच मैदानात लावून त्याची तपासणी करण्यात आली. अनेक रिक्षाचालकांनी आरटीओसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिक्षा उभ्या केल्या होत्या. परिवहन कार्यालयाच्या आवारात जागा नसल्याने वाहनधारकांसह येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जड वाहनांसाठीही कार्यालयात जागा व ट्रॅक नसल्याने शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये जड वाहनांची तपासणी केली जात आहे. 

दिली होती सूचना 
लष्कराच्या जागेवर आरटीओने वाहने उभी करू नयेत, अशी तोंडी सूचना यापूर्वीच लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, आरटीओ कार्यालयाने त्याकडे दुर्लक्ष करून लष्कराच्याच मोकळ्या जागेवर वाहनांच्या तपासणीचे काम सुरू ठेवले. लष्कराच्या पथकाने वाहनांना हुसकावून लावले. त्यामुळे यापुढे आक्रमक पावित्रा घेतला जाण्याची शक्‍यता आहे. आरटीओचे कामही शासकीय काम आहे, जागा लष्कराची असली तरीही या जागेचे कुठलेही नुकसान होत नाही, तरीही लष्कराकडून मज्जाव केला जात असल्याने आरटीओ अधिकाऱ्यांची पंचायत झाली आहे.

Web Title: Army beat rickshaw driver