मातीला पर्याय ठरतेय राखेची वीट

आदित्य वाघमारे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - आतापर्यंत माती अथवा सिमेंटच्या विटा टिकाऊ, सुरक्षित बांधकामास वापरण्यासाठी व्यावसायिकांकडून प्राधान्य दिले जाते. याला पर्यायी म्हणून जालन्यातील उद्योजक आनंद मुळे यांनी औष्णिक प्रकल्पातून निघणाऱ्या राखेपासून पर्यावरणपूरक विटांचे उत्पादन घेतले. या विटांच्या अनेक फायद्यांमुळे मुंबई-पुण्यानंतर मराठवाड्यातील ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. 

मातीचा वापर करून वीट तयार करण्याची परंपरा शेकडो वर्षांची. पर्यावरणाची जपणूक आणि टाकाऊ राखेचा वापर करून समतोलही साधला जातो. मातीविटेच्या तुलनेत औष्णिक प्रकल्पातून टाकाऊ म्हणून बाहेर पडणाऱ्या राखेचा वापर करून व्यावसायिक तत्त्वावर वीट तयार करण्याचा कारखाना जालना येथील युवक आनंद मुळे यांनी सुरू केला आहे. त्याआधी वीट तयार करण्याच्या ठिकाणी त्यांनी धडे घेतले आणि धाडसाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. याविषयी माहिती देताना श्री. मुळे म्हणाले, "" आज महिन्याकाठी साठ हजार वीट आपण तयार करतो. ही वीट बांधकामांना मोठी मजबुती देणारी आहे. या विटेचे मूल्य मातीच्या विटेएवढेच आहे. औष्णिक प्रकल्पांजवळ या विटांचे कारखाने आहेत. पण मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्येही या विटांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.‘‘

मातीऐवजी राख
"मातीचा वापर करून वीट तयार करण्यात येत असेल तर ती पूर्णपणे भाजून बाहेर पडण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागतो. पण साधारण पंधरा दिवसांच्या अवधीत ही वीट तयार होते, असे आनंद मुळे यांनी सांगितले. यात मातीऐवजी 50 टक्‍क्‍यांपर्यंत राख, 25 टक्के क्रशरमधून निघणारी कच आणि उर्वरित सिमेंट, असा वापर केला जात असल्याने कोठेही माती उकरण्याची गरज राहत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राखेपासून बनविलेल्या विटेचे फायदे
- भार सांभाळण्याची क्षमता अधिक.
- पाणी कमी शोषते. भिंतींची गळती कमी होते.
- पर्यावरण पूरक, मातीचा वापर शून्य.
- कमी तापत असल्याने एअर कंडिशनिंगचा खर्च घटतो.
- क्वॉलिटी कंट्रोल असल्याने दर्जेदार.
- समान माप, चांगली फिनिशींग, चांगले प्लास्टर देते.
- आवाज शोषण्याची क्षमता अधिक.
- पावसाळ्यातही निर्मिती.