पैसा सांभाळून खर्च करा, 90 टक्‍के एटीएम बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

औरंगाबाद - रिझर्व्ह बॅंकेकडून होणाऱ्या अपुऱ्या चलन पुरवठ्याने शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यापासून ऐंशी ते नव्वद टक्‍के एटीएम बंद आहेत. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 13 मार्चला संपुष्टात आल्याचा हा परिणाम असल्याची माहिती बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

औरंगाबाद - रिझर्व्ह बॅंकेकडून होणाऱ्या अपुऱ्या चलन पुरवठ्याने शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यापासून ऐंशी ते नव्वद टक्‍के एटीएम बंद आहेत. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 13 मार्चला संपुष्टात आल्याचा हा परिणाम असल्याची माहिती बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

नोटाबंदीचा निर्णय आठ नोव्हेंबर 2016 ला जाहीर करण्यात आला. त्यानंतर महिनाभर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. एटीएम आणि बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी पहाटेपासून गर्दी होत होती. त्यामुळे आठ नोव्हेंबर 2016 ते 13 मार्च 2017 पर्यंत रिझर्व्ह बॅंकेने हाताबाहेर चाललेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दररोज नवनवे प्रयोग बॅंक आणि त्यांच्या खातेधारकांवर केले. फेब्रुवारीपासून नोटाबंदीमुळे उद्‌भवलेली परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे बॅंका व खातेधारकांना दिलासा मिळाला होता. मात्र, सर्व परिस्थती नियंत्रणात असल्याचे सांगून रिझर्व्ह बॅंकेने 13 मार्चला एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा मागे घेतली. त्याचा परिणाम तत्काळ दिसला नाही.

यादरम्यान काही प्रमाणात रिझर्व्ह बॅंकेकडून पतपुरवठा झाला होता. मात्र, 13 मार्चपासून रिझर्व्ह बॅंकेकडून एकाही करन्सी चेस्टला पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंका मुंबई, पुणे आणि नाशिक येथून आपल्या खातेधारकांसाठी पैशांची जमवाजमव करताना दिसताहेत. मार्चएंड संपल्यानंतर एक एप्रिलपासून शासकीय, खासगी नोकरवर्गाच्या पगाराला सुरवात होते. त्यामुळे आपले पैसे बॅंक अथवा एटीएममधून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. परिणामत: बॅंकांच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या. सध्या दररोजचे व्यवहार करणेही बॅंकांना अशक्‍य होत आहे. त्यामुळे एजन्सीला एटीएम मशिनमध्ये पैसे देण्यासाठीसुद्धा बॅंकाकडून टाळाटाळ होत आहे.

परिणामी सातशेपैकी जवळपास साडेसहाशे एटीएम बंदावस्थेत आहेत.
काही एटीएमना तर पंधरवड्यापासून कुलूप लावण्यात आले. ते उघडण्याचीही तसदी एजन्सीने घेतलेली नाही. इतकेच काय बॅंकेतून थेट लागेल तितके पैसे देण्यासही बॅंकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे चलनपुरवठ्याअभावी आर्थिक टंचाई निर्माण झालेली आहे. लवकरात लवकर रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्‍यता बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्‍त होत आहे.

Web Title: atm close