गाळ्यांच्या कारवाईत वजनदारांना ‘भाव’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेची धूळफेक; सात जणांवर कारवाई, दोघांना सोडले
औरंगाबाद - महापालिकेसोबत करण्यात आलेला भाडेकरार संपल्यानंतरही व्यापारी संकुलामध्ये ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी (ता. १७) कारवाई सुरू करण्यात आली; मात्र राजकीय दबावाखाली अनेकांना अभय देत या कारवाईत दुजाभाव करण्यात येत आहे. आज दिवसभरात रॉक्‍सी टॉकीज परिसरातील व्यापारी संकुलात केवळ सात दुकानांना सील करण्यात आले. 

महापालिकेची गेल्या काही वर्षात ‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशीच अवस्था झाली आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढावे, तिजोरीतील खडखडाट दूर व्हावा, म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवर मोक्‍याच्या ठिकाणी व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे भाडे या गाळेधारकांकडे थकीत आहे. अनेकांनी पोटभाडेकरू ठेवून वरकमाई सुरू केलेली आहे; मात्र प्रशासनाला जाग आली नाही. शेवटी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांची न्यायालयाने स्वतः होऊन दखल घेत या प्रकरणी कारवाई करण्याच आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. 

सुमारे तीनशे गाळ्यांना सील करून २१ ऑगस्टला अहवाल सादर करण्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार महापालिकेने तीन पथक स्थापन केले आहेत. मात्र त्यातील दोन पथके अद्याप कागदावर असून, एका पथकाने मात्र गुरुवारी रॉक्‍सी टॉकीजजवळील व्यापारी संकुलावर कारवाई केली. या कारवाईत मात्र दुजाभाव करण्यात आला. कारवाई सुरू होतात दोन दुकानदारांवर कारवाई करू नये म्हणून काही नेत्यांचे महापालिका अधिकाऱ्यांना फोन सुरू झाले. शेवटी त्या दोघांना वगळून सात जणांचे गाळे सील करण्यात आले. सुमारे दीड तास ही कारवाई सुरू होती. 

२७ दुकाने कायम बंद 
महापालिकेने या मुख्य रस्त्यांवर सुमारे चाळीस वर्षांपूर्वी व्यापारी संकुल उभारले आहे. एकूण ३७ गाळे असले तरी त्यातील २७ गाळे बंद आहेत. उर्वरित गाळ्यांपैकी अनेकांनी मध्येच दुकाने सोडली, तर दहा जणांचे करार संपलेले होते. त्यातील सात जणांवर आज कारवाई करण्यात आली, तर दोघांनी न्यायालयाच्या आदेशाने पन्नास टक्के थकबाकी भरलेली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली. 

विरोधानंतरही कारवाई 
महापालिकेचे पथक व्यापारी संकुलामध्ये धडकताच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. विजय देशमुख या व्यापाऱ्याने महापालिकेच्या पथकाला विरोध केला; मात्र तुमचा करारनामा संपून आठ ते दहा वर्षे झाले आहेत, याची जाणीव अधिकाऱ्यांनी करून दिली. त्यानंतर बऱ्याच वादावादीनंतर पथकाने कारवाई पूर्ण केली. या पथकात उपअभियंता खमर शेख, एम. एम. खान, सय्यद जमशिद, शफी अहमद यांचा समावेश होता.