चिकलठाण्यात महावितरणलाच ‘शॉक’

चिकलठाण्यात महावितरणलाच ‘शॉक’

औरंगाबाद - वीजगळती आणि प्रचंड थकबाकीने अडचणीत आलेल्या महावितरणला कर्मचाऱ्यांनीच पोखरल्याचा धक्कादायक प्रकार चिकलठाणा उपविभागात उघड झाला. मोठी थकबाकी असलेल्या आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या (पीडी) ग्राहकांना घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने मीटर देण्याचा प्रताप करण्यात आला. जवळपास पावणेतीन लाख रुपये थकबाकी असलेल्या दहा जणांच्या जुन्या आणि नव्या बिलांसह सहव्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार करण्यात आली; मात्र या तक्रारीवर कारवाई झाली नसल्याने काही कर्मचाऱ्यांचे उपद्‌व्याप सुरूच आहेत. 

महावितरणची औरंगाबाद परिमंडळात जवळपास चाळीस टक्के वीजगळती आहे. वीजगळती म्हणजे त्यात चोरीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची थकबाकी झाली आहे. ही थकबाकी वसुली आणि वीजगळती कमी करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया हे स्वत: एखाद्या लाइन स्टाफप्रमाणे रस्त्यावर उतरून चोऱ्या उघडकीस आणत आहेत. दुसरीकडे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनीही संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. धडक कारवाई आणि थेट रिझल्ट असे सध्या कारवाईचे स्वरूप आहे; पण चिकलठाणा उपविभागात असलेल्या चिकलठाणा, हीनानगर या भागात मोठ्या प्रमाणावर उपद्‌व्याप केल्याचे प्रकार उघड झाले. येथील एका कर्मचाऱ्याने आर्थिक तडजोडी करून महावितरणला खड्ड्यात घालण्याचे काम केल्याचे सूत्रांनी सांगितले.

महावितरणमध्ये मोठी थकबाकी असल्यास वीजपुरवठा कापला जातो. त्यात तात्पुरता आणि कायमस्वरूपी अशा दोन प्रकारांत वीजपुरवठा कापण्यात येतो. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला, त्या ग्राहकांकडून वसुली व्हावी म्हणून महावितरणने अभय योजना आणली आहे. यात दंड आणि व्याज माफ करण्यात येऊन पुन्हा वीजपुरवठा सुरू करून दिला जातो; मात्र येथील एका कर्मचाऱ्याने नागरिकांना या योजनेचाही लाभ घेऊ दिला नाही, तर थकबाकी सोडून द्या, मी तुम्हाला दुसरे मीटर देतो असे म्हणून ‘अर्थ’पूर्ण व्यवहार करून नागरिकांना थकबाकी असतानाही घरातील अन्य सदस्यांच्या नावाने नवीन मीटर बसवून दिलेत.

पोस्टाने पाठवली तक्रार 
चिकलठाणा उपविभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट कारभार करून महावितरणच्या हिताला बाधा पोचवली जात असल्याने एका जागरूक नागरिकाने दहा जणांची माहिती काढून त्यांच्या जुन्या आणि नव्या मीटरची माहिती सहव्यवस्थापकीय संचालकांना पोस्टाने पाठवली आहे. दहा ग्राहकांची माहिती असली तरीही सदर कर्मचाऱ्याने मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने महावितरणचे नुकसान करून स्वत:चा आर्थिक लाभ करून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. 
 

तक्रारीनुसार काही मीटर 
जुने मीटर (थकबाकीचे)                थकबाकी                    नवीन मीटर 

१) क्रमांक ४९००१२३७०२८५          ७८४० रुपये         १) ४९००१८३०३४०७   २) क्रमांक ४९००१८२८५४३             ५९८०               २) मीटर घरात आहे. 
३) क्रमांक ४९००११०८६१६८          ११६१०               ३) ४९००१२३०९८६१
४) क्रमांक ४९००१२०५३२७१          ५२१६०               ४) ४९००१३३६२८०४
५) क्रमांक ४९००१०८२३८६०           ५४४६०              ५) ४९००१३३७९२१९
६) क्रमांक ४९००१०९७६७७१           १८०९०              ६) ४९००१०८२५३०७
७) क्रमांक ४९००१२३०८६२८          ५२५७०               ७) ४९००१३३८१११६
८) क्रमांक १९००१०८२६२०६          २८८६०               ८) ४९००१०८२६६८१
९) क्रमांक ४९००११२८२९७८          ३१३४०               ९) ४९००१८३७८३४२
१०) क्रमांक ४९००१०८२१८१६        १८६००              १०) ४९००१०८२१८२४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com