आयुष्याच्या संध्याकाळी काठीचाच आधार

Service
Service

औरंगाबाद - मुलांनी उज्ज्वल भविष्य घडवावे, असे स्वप्न प्रत्येक आई-वडिलांचे असते. त्यासाठी ते मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतात; परंतु शिक्षणाच्या निमित्तानं मुलं घर सोडतात ती कायमचीच. शिक्षण, नोकरीनिमित्त घरापासून दूर गेल्यानंतर तिकडे मुलांचे स्ट्रगल, तर इकडे आई-वडिलांची घुसमट अशा स्थितीत दोन्ही बाजूने भावनिक गुंता वाढतो आहे. मुलांकडून अनपेक्षितपणे आई-वडिलांकडे दुर्लक्ष होते. त्यातून अनेक ज्येष्ठांना आयुष्याच्या संध्याकाळी फक्त काठीचाच आधार राहतो. 

नात्यांची वीण सैल 
नातं, व्यक्ती आणि प्रेम यातून आत्मीयता, आपुलकी, आदर, ऋणानुबंध वाढीस लागतो. त्यातून एक भक्कम कुटुंब निर्माण होऊन दृढ बनतं; परंतु नात्याची वीण सैल होत आहे. कुटुंबातील ज्येष्ठ आधार म्हणून तरुणाईकडे पाहतात; पण तीच तरुणाई शिक्षण, नोकरीनिमित्त दूर जात आहे. आता कुटुंब ही संकल्पना पती-पत्नीभोवतीच मर्यादित होत आहे.

मुलांचीही अडचण...
चांगले शिक्षण त्यानंतर चांगली नोकरी मिळावी, म्हणून बहुतांश मुलं जिवाचे रान करतात. अपेक्षित नोकरीसाठी, रोजगारासाठी त्यांनाही शहर गाठावे लागते. आपले गाव, आपली माणसं सोडून एकाकी राहावे लागते; पण मुलांनाही कुटुंबाची चिंता सतावते. दूर गेल्याची रुखरुख लागते. आई-वडिलांची जाणही असते. त्यांच्या उतारवयातील आयुष्याबाबतही ते विवंचनेत असतात. अशा परिस्थितीत त्यांची घालमेल होते.

व्यक्तित्वातही बदल
वाढत्या स्पर्धेमुळे मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. सुख-सुविधांसाठी बहुतांश मुलं स्वत:ला व्यस्त ठेवून कामावर लक्ष केंद्रित करतात. यातून स्वत:पुरता विचार करण्याची वृत्ती वाढीस लागून एकत्रित कुटुंबापेक्षा विभक्त कुटुंबाकडे कल वाढत आहे. त्यातूनच व्यक्तित्वातही बदल होतो.

प्रत्येक वेळी मुलं व्यक्त होत नाहीत. पालकांनी त्यांच्या आयुष्यातील बदलांवर त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देणेही आवश्‍यक आहे. मुलांनीही काही बाबी लक्षात ठेवाव्या त्या अशा, की आई-वडिलांनी घडवलंय. नोकरीसाठी दूर गेले असाल तरीही त्यांच्याशी भावनिक नाळ जुळलेलीच असावी. पालकांशी सतत संवाद आवश्‍यक असून, ख्याली खुशालीसोबतच प्रत्येक विषयावर सर्वंकष चर्चा करावी, त्यामुळे नात्यातील वीण घट्ट राहील.
- डॉ. संदीप शिसोदे, समुपदेशक.

मुलं दूर जातात तेव्हा मानसिक त्रास होतो. आजारपण वाढते, उतारवयात सांभाळायला कुणी नसते. शिक्षणासाठी मुलं दूर जातात, स्पर्धा वाढली खरे आहे; पण ग्रामीण भागातूनही आयएएस होता येते. त्यासाठी शहरातच जावे लागते असे काही नाही. आई-वडिलांजवळ राहूनही चांगले शिक्षण व अभ्यास करता येतो. मुलांनी आई-वडिलांना आधार देण्याची गरज आहे.
- अनिल चौधरी, सचिव, सदाचार संवर्धन, ज्येष्ठ नागरिक संघटना.

असे का होते?
कुटुंबापासून दूर जाण्याच्या तीन अवस्था आहेत. घरच्या वातावरणातून बाहेर पडायचे म्हणून घर सोडणे, महत्त्वाकांक्षेसाठी पालकांचा सपोर्टने बाहेर पडणे, तिसऱ्या प्रकारात मौजमजेसाठी तसेच स्टेट्‌सचा प्रश्‍न व विभक्त राहण्यासाठी घर सोडणे. बाहेर पडलेल्या मुलांचा भावनिक, व्यावहारिक आत्मविश्‍वास वाढत गेला, की त्यातून त्यांचे व्यक्तित्व तयार होते. तेथील वातावरणात मुलं रुळतात.  मग मानसशास्त्रीय दृष्टीने गरजेपुरताच आई-वडिलांसोबत संवाद राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com