घाटीला केंद्राकडून निधी मिळवून देणार - खासदार खैरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) श्रेणी आणि क्षमतावर्धन करण्यासाठी शासनाकडे २३२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. त्यांनी शनिवारी (ता. १२) घाटीच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. 

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) श्रेणी आणि क्षमतावर्धन करण्यासाठी शासनाकडे २३२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. त्यांनी शनिवारी (ता. १२) घाटीच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. 

बैठकीत डॉ. कानन येळीकर यांनी प्रशासनात येणाऱ्या अडचणी, यासह निधी मिळण्यासाठी येणारे अडथळे अशा सर्वच समस्या मांडल्या. उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी प्रस्तावित कामांचे प्रेझेंटेशन केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेकडून एमटीआर व जेट मशिनची मागणी केली. नगरसेवक सचिन खैरे यांनी सुरक्षा भिंत बांधताना मागच्या बाजूने रुग्णवाहिका येण्याची व्यवस्था असावी, असे सुचविले. त्यावर निधी आल्यावर निर्णय घेऊ, असे डॉ. येळीकर यांनी स्पष्ट केले. प्रभारी अधीक्षक डॉ. गजानन सुरवडे, डॉ. के. यू. झिने, डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर, डॉ. कल्पना कडू यांनी त्यांच्या विभागातील प्रलंबित कामांविषयी माहिती दिली. 

बैठकीला डॉ. सरोजिनी जाधव, ॲड. आशुतोष डंख, बी. व्ही. जोशी, हिरा सलामपुरे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश देहाडे, सुभाष जाधव यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. खंडेलवाल, उपअभियंता कदीर अहेमद, अभ्यागत समिती सदस्य नारायण कानकाटे, किरण गणोरे, मुकुंद फुलारे, विजय सूर्यवंशी, राजू भैरव उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निधी उपलब्ध असलेली कामे जलद गतीने मार्गी लावण्याची सूचना खासदार खैरे यांनी केली. डॉ. अरविंद गायकवाड यांनी कर्करोग रुग्णालयाच्या विकासकामांचा आढावा बैठकीत सादर केला.

अस्वच्छतेमुळे विद्यार्थी डॉक्‍टर आजारी
अस्वच्छता आणि दुर्गंधीने विद्यार्थी डॉक्‍टर आजारी पडत आहेत. दर आठवड्याला एका विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते आहे, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले. त्यावर घाटीतील कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग आणि पाण्याचे नमुने तपासायला सोमवारी सुरवात होईल, असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठवाड्याची शोकांतिका
इतर राज्यांत एम्सच्या धर्तीवर रुग्णालये उभारणीसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. दहा जिल्ह्यांच्या आशेचा किरण असलेल्या विभागीय रुग्णालयाला वर्षाकाठी दहा ते बारा कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याची शोकांतिका डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केली. त्यावर खासदार खैरे यांनी घाटीच्या श्रेणी व क्षमतावर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी खेचून आणू, असे आश्वस्त केले.

Web Title: aurangaabad marathwada news The fund will be ghati by center