करदाते हे देशाचे आदर्शवादी नागरिक - शिवदयाल श्रीवास्तव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

औरंगाबाद  - ‘‘राष्ट्रनिर्माणास आदर्श कार्य म्हटले जाते. करदाते कर भरून राष्ट्रनिर्मितीसाठी हातभार लावतात. यामुळे तुम्हीही आदर्शवादी नागरिक आहात,’’ असे प्रतिपादन प्रधान प्राप्तिकर आयुक्‍त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले. प्राप्तिकरासंदर्भात भावी पिढीला मार्गदर्शन करा, असे आवाहन त्यांनी केले.  

औरंगाबाद  - ‘‘राष्ट्रनिर्माणास आदर्श कार्य म्हटले जाते. करदाते कर भरून राष्ट्रनिर्मितीसाठी हातभार लावतात. यामुळे तुम्हीही आदर्शवादी नागरिक आहात,’’ असे प्रतिपादन प्रधान प्राप्तिकर आयुक्‍त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले. प्राप्तिकरासंदर्भात भावी पिढीला मार्गदर्शन करा, असे आवाहन त्यांनी केले.  

प्राप्तिकर विभागातर्फे सोमवारी (ता. २४) एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात प्राप्तिकर दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास अपिलीय आयुक्‍त मनोज कुमार गौतम, राहुल कर्णा, बिग्रेडिअर अनुगराग ब्रिज, पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, अतिरिक्‍त आयुक्‍त संदीपकुमार साळुंके, संजय देशमुख, विश्‍वास मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. श्रीवास्तव म्हणाले, ‘‘देशाच्या प्रगतीसाठी प्राप्तिकर महत्त्वाचा आहे. करदाते हे हिऱ्यासमान आहेत. आम्ही त्यांची पारख करणारे असून, हेच करदाते देशाचे आदर्शवादी नागरिक आहेत.’’ कार्यक्रमात प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या दोन लाख रुपयांपैकी ७० हजार रुपयांचा धनादेश केळगाव (ता. सिल्लोड) येथील शहीद जवान संदीप जाधव यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. एक लाख रुपयांचा धनादेश बीड जिल्ह्यातील गेवराईच्या बालग्राम या अनाथालयाच्या संस्थेस गरजेच्या वस्तूंसाठी संतोष गर्जे यांच्याकडे देण्यात आला. प्राप्तिकर दिनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात सहा ठिकाणी रक्‍तदान शिबिर झाले. विविध महाविद्यालयांत निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विजेते ठरलेले शिवाजी डांगे, श्‍यामला भारुका, सहिदा नखवी, रेणुका जगताप यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या काही पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये आयआयटी पवईमध्ये प्रवेश मिळविलेल्या मयंक संजय भगत, यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेले धम्मपाल खंडागळे, करुण घोडके यांचा समावेश होता. सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, सीए असोसिएशनचे अल्केश रावका, मसिआचे सुनील किर्दक, टीपीआयचे विलास कुलकर्णी, रवींद्र करविंदे, व्यापारी महासंघाचे अजय शहा, एआयएएसचे मनीष भंडारी यांनीही सहकार्याची भूमिका बजाविल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राप्तिकर विभागास १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माहितीपट दाखविण्यात आला. अतिरिक्‍त आयुक्‍त संदीपकुमार साळुंके यांनी सूत्रसंचालन केले.