क्रिकेट संघटनेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

क्रिकेट संघटनेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

औरंगाबाद- धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. तब्बल आठ वर्षांनंतर होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी रविवारी (ता.27) मतदान होणार आहे.
नोव्हेंबर 2008 मध्ये औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक पार पडली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुका लांबत गेल्या. सप्टेंबर महिन्यात सहधर्मादाय आयुक्तांनी या संघटनेशी निगडीत प्रकरणे निकाली काढत 1988 मध्ये निवडून आलेली कार्यकारिणीच ग्राह्य धरली होती. या कार्यकारिणीने जिल्हा क्रिकेट संघटनेची दोन महिन्यांत निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश दिले होते. तत्कालीन सचिव आज हयात नसल्याने सहसचिव किरण जोशी यांच्यावर हा निवडणूक कार्यक्रम राबविण्याची जबाबादारी सोपवण्यात आली आहे.
आठ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये अनेक नवे-जुने दिग्गज मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. या निवडणुकांसाठी शनिवारी (ता.19) अर्ज विक्री सुरू झाली होती. रविवारपर्यंत (ता.20) या निवडणुकांसाठी पस्तीस अर्ज इच्छुकांनी नेले असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्यालयातून सांगण्यात आली. ऍड. सुजित कार्लेकर हे निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका पार पाडणार आहेत.
------
गुरुवारी पडताळणी, रविवारी मतदान
जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर शनिवारपासून (ता.19) उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची लगबग सुरू झाली असून मंगळवारी (ता.22) अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. गुरुवारी (ता.24) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्जांची पडताळणी होईल. शुक्रवारी (ता.25) दुपारी तीन ते पाचदरम्यान अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. रविवारी (ता. 27) नव्या कार्यकारिणीसाठी हॉटेल विंडसर कॅसल येथे सकाळी अकरा ते दुपारी 2 दरम्यान मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी निकालही जाहीर होणार आहे.
--
पस्तीस अर्जांची विक्री
सहधर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी पस्तीस इच्छुकांनी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्यालयातून अर्ज नेले. यात सचिन मुळे, अनंत नेरळकर, दिनेश कुंटे, डॉ. एस. एल. संचेती, जे. यू. मिटकर यांचा समावेश आहे. 25 रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
--
दोन गट आमनेसामने?
जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकांसाठी अनेकांनी अर्ज नेले असले, तरीही निवडणूक दोन गटांमध्येच रंगण्याची चिन्हे आहेत. विद्यमान परिस्थिती पाहता या निवडणुकीत तीन गटांच्या सदस्यांनी उडी घेतली आहे. असे असले तरी, ही निवडणूक दोन गटांमध्येच लढली जाणार असल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. दरम्यान 27 ला होणाऱ्या मतदानासाठी भेटीगाठी घेण्यास काही इच्छुकांनी सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com