मुख्यमंत्र्यांची ऊर्जामंत्र्यावर पुन्हा कुरघोडी

प्रकाश बनकर
गुरुवार, 18 मे 2017

औरंगाबाद: महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या संचालकपदावरून गेल्या महिनाभरापासून चांगलेच राजकारण सुरु आहे. या पदावर सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांची राज्याच्या कृषी आयुक्‍तपदी निवड केल्यानंतर संचालक पदावर ऊर्जामंत्र्यांनी आपल्या मर्जीतील नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांची औरंगाबादला बदली केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे महाबीजचे संचालकपदी बदली झालेल्या ओमप्रकाश बकोरीया यांची बदली आता महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयात सह-व्यवस्थापकीय संचालकपदावर केली आहे.

औरंगाबाद: महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या संचालकपदावरून गेल्या महिनाभरापासून चांगलेच राजकारण सुरु आहे. या पदावर सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांची राज्याच्या कृषी आयुक्‍तपदी निवड केल्यानंतर संचालक पदावर ऊर्जामंत्र्यांनी आपल्या मर्जीतील नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांची औरंगाबादला बदली केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे महाबीजचे संचालकपदी बदली झालेल्या ओमप्रकाश बकोरीया यांची बदली आता महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयात सह-व्यवस्थापकीय संचालकपदावर केली आहे. एका पदावर दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्यामूळे मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्र्यावर चांगलीच कुरघोडी केल्याची चर्चा सध्या राज्यभर रंगू लागली आहेत.

महावितरणतर्फे मराठवाड्यातील आठ आणि खांदेशातील तीन, अशा 11 जिल्ह्यांच्या वीज वितरण प्रणालीत सुधारणा करणे, वसुली वाढविणे व वीज गळती कमी करण्यासाठी ऑक्‍टोबर 2016 मध्ये प्रादेशिक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मराठवाडा आणि विदर्भ आणि खांदेश या भागांत मोठ्या प्रमाणावर वीजगळती, वीजचोरी आणि थकबाकी आहे.थकबाकी वसूल करणे, महावितरणच्या सुविधा- सेवा सुधारणे, परिमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी ही कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. 22 एप्रिलला राज्यातील 31 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.यामध्ये सुनील केंद्रेकर यांची महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. मात्र, त्यांची बदली पूणे येथील राज्याच्या कृषी आयुक्‍तपदी बदली मिळाली.

सुनील केंद्रकरांची नियुक्‍ती ऊर्जामंत्र्यांना चांगलीच खटकली होती. यामूळे ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यात वादही झाला होता. केंद्रेकरांनंतर ऊर्जामंत्र्यांनी शुक्रवारी (ता. 12) नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे यांची बदली औरंगाबादच्या प्रादेशिक कार्यालयात केली. रेशमे यांच्या जागी भालचंद्र खंदाईत यांनी मंगळवारी(ता.16) नागपूर संचालकपदाचा पदभार स्वीकारला. रेशमे हे याच आठवड्यात पदभार स्वीकारणार होते. मात्र, त्यातच गुरुवारी (ता.18) ओमप्रकाश बकोरिया यांची याच पदावर बदली झाल्याची माहिती समोर आली आहेत. यामूळे महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचा पदभार ऊर्जामंत्र्यांचा अधिकारी स्वीकरणार की मुख्यमंत्र्याचा यांचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Web Title: aurangabad: devendra fadnavis and mahavitran politics