औरंगाबादेतील उद्योग क्षेत्राला आर्थिक बूस्टर डोस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

वीजदर सवलत, इंडस्ट्रिअल क्‍लस्टर विकासासाठी 570 कोटी

औरंगाबाद- औरंगाबादेत कार्यरत असलेल्या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा भरीव तरतूद करण्यात आली आहे. इंडस्ट्रिअल क्‍लस्टर विकासासाठी 570 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय उद्योगांच्या वीजदर सवलतीसाठी मराठवाडा, विदर्भाला मिळणाऱ्या एक हजार कोटींचा फायदाही औरंगाबादला होणार आहे.

वीजदर सवलत, इंडस्ट्रिअल क्‍लस्टर विकासासाठी 570 कोटी

औरंगाबाद- औरंगाबादेत कार्यरत असलेल्या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा भरीव तरतूद करण्यात आली आहे. इंडस्ट्रिअल क्‍लस्टर विकासासाठी 570 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय उद्योगांच्या वीजदर सवलतीसाठी मराठवाडा, विदर्भाला मिळणाऱ्या एक हजार कोटींचा फायदाही औरंगाबादला होणार आहे.

औरंगाबादेत असलेल्या उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2017-18 च्या अर्थसंकल्पात बूस्टर डोस जाहीर केला आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत येणाऱ्या उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सध्या सुरू आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात असतानाच औरंगाबादेत समूह विकास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या औद्योगिक समूह विकास योजनेसाठी केंद्राच्या माध्यमातून अंशदान म्हणून 570 कोटी रुपये दिले जाणार असल्याची घोषणा शनिवारी (ता. 18) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. औरंगाबादेत सुरू करण्यात आलेल्या विधी विद्यापीठासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबोदतील विधी विद्यापीठासाठी 39 कोटी 28 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदाही औरंगाबाद शहराला होणार आहे.

उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार कोटी
मराठवाडा आणि विदर्भात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी शासनाने विजेवर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. येथे येणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी, वीज सवलतीच्या दरात दिली जाणार आहे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भासाठी एकूण 1 हजार कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या माध्यमातून औरंगाबाद शहरात येऊ घातलेल्या उद्योगांना फायदा होणार आहे.

स्मार्ट सिटींसाठी 1600 कोटी
स्मार्ट सिटी योजनेच्या दुसऱ्या फेरीत औरंगाबाद शहराची निवड करण्यात आली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक आणि ठाणे या शहरांचा समावेश आहे. या योजनेसाठी राज्य आणि केंद्राचा हिस्सा अशी 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा शहराला फायदा होणार असून, औरंगाबाद महापालिकेच्या हिश्‍श्‍याचे 650 कोटी राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा यापूर्वी औरंगाबादेत झालेल्या कॅबिनेट बैठकीदरम्यान करण्यात आली होती.

राज्य कर्करोग संशोधन संस्था औरंगाबादेत
औरंगाबादेत आमखास मैदानासमोर कर्करोग रुग्णालय सुरू आहे. आता औरंगाबादेतील या रुग्णालयाला राज्यस्तरीय कर्करोग संशोधन संस्था म्हणून तयार केले जाणार आहे. राज्य कर्करोग संशोधन संस्थेसाठी 126 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Web Title: aurangabad industry