मुख्यमंत्री फडणवीस अन् अजित पवार सोबत प्रवास करतात तेव्हा...

अजित पवार, देवेंद्र फडणवीस
अजित पवार, देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद : वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बाजूला ठेवून काही काळ का असेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँगसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच विमानातून, एकाच गाडीतून प्रवास केला आणि उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अनेकजण अवाक झाले, आश्‍चर्य व्यक्त केले. राजकारण करीत असताना प्रसंगी पक्ष बाजूला ठेवून व्यक्तिगत संबंध जपावे लागतात, असे नेतेमंडळी नेहमीच सांगतात; पण 'दोन ध्रुवांवर दोघे आपण' असे म्हणणारे दोन नेते असे एकत्र येतात तेव्हा तो निश्‍चितच चर्चेचा विषय ठरतो आणि तो मंगळवारी (ता.21) ठरला... आता दोघांमध्ये नेमके काय गुफ्तगू झाले, याबद्दलच्या चर्चेला राजकीय वर्तुळात एकाच उधाण आले आहे. 

मंगळवारी (ता. 21) पार पडलेल्या शहरातील एका विवाहसमारंभासाठी सत्ताधारीसह विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र, आपला हा दौरा अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा गोपनीय ठेवला होता. मुंबईहून रात्री पावणेदहाच्या सुमारास खास विमानाने ते थेट चिकलठाणा विमातळावर उतरले तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवारही होते. विमानातून उतरल्यावर वाहनापर्यंत जाताना दोघांनी विशिष्ट अंतर राखले. तरीही दोघे एकाच सफारी वाहनात बसले! 'सफारी' तून उतरल्यावर समारंभस्थळी जाताना, वधू-वरांना शुभेच्छा देताना, अल्पोपाहार घेवून तेथून बाहेर पडतानाही दोघांनी एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर राखले. चिकलठाणा विमानतळाकडे मार्गस्थ होताना मात्र हे दोन नेते पुन्हा एकाच सफारी कारमध्ये बसले! आले त्या विमानातून रात्री दहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्हणजे विमान व कारमध्ये या दोघांशिवाय अन्य कुणी नव्हते. 

आघाडी सरकारवर मात करून भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले. विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि सत्ताधारी अजित पवार विरोधक बनले. तेव्हापासून एकमेकांवर टीकेची एकही संधी या दोघांनी सोडलेली नाही. शेतकऱ्यांसह अन्य कुठल्याही मुद्यावर फडणवीस सरकारविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडत आपल्या पक्षाच्या माध्यमातून पवार हे सातत्याने आंदोलनांचे हत्यार उपसत आहेत. संधी मिळेल तेव्हा फडणवीस त्यांना प्रत्युत्तर देत आहेत.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांबाबत सतत संभ्रम निर्माण केला जातो. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादीचा कोणताही नेता मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलाविणार नाही, अशी घोषणाच अजित पवार यांनी 14 नोव्हेंबरला मुंबईत केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, महाराष्ट्रात राजकीय विरोध असला, तरी व्यक्‍तिगत कटुता कधीही बाळगली जात नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपल्या घोषणेला आठ दिवस होत नाहीत तोच या दोघांचे एकत्र येणे, राजकीय अंदाज बांधणाऱ्यांना बुचकळ्यात टाकणारे, चर्चेला मोठा खुराक पुरविणारे आहे, हे निश्‍चित. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com