पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणी आता घरबसल्या! 

मनोज साखरे
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची सुविधा पोलिस ठाण्यांना मिळाले टॅबलेट 

औरंगाबाद : पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणी करणाऱ्यांसाठी आता ठाण्यांत जाण्याची कटकट टळणार आहे. खुद्द पोलिस आता तुमच्या वेळेनुसार, घरी येऊन चारित्र्य पडताळणी करतील. त्यामुळे घरबसल्या तुम्ही पडताळणी करू शकता, त्यासाठी औरंगाबाद अधीक्षक कार्यालयाच्या कक्षेतील पोलिसांना टॅबलेटही पुरविण्यात आले आहे. 

पासपोर्टसाठी अर्ज भरण्यापासून ते मिळण्यापर्यंत बऱ्याच प्रक्रियेतून जावे लागते. यात काही बाबी कटकटीच्याही वाटतात, तसेच पासपोर्टसाठी विलंब होऊन वेळेचाही मोठा व्यय होतो. अशा कटकटीपासुन सुटका करण्यासाठी नविनतम सुविधा देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पोलिस घरी येऊन चारित्र्य पडताळणी करणार आहेत. पासपोर्टसाठी नागरिकांनी अर्ज केल्यास त्या नागरिकांच्या घरी आता चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. ठाण्यातील गोपनिय शाखेत काम करणारे पोलिस नागरिकांच्या वेळेनुसार व त्यांनी बोलावल्यानुसार घरी जातील व एम-पासपोर्ट प्रणालीअर्तंगत पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पार पाडतील.

नागरिकांना एकप्रकारे ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यामुळे चारित्र्य पडताळणी तात्काळ होऊन पासपोर्ट मुदतीत मिळु शकेल. या सुविधेमुळे आता अधीक्षक कार्यालय व ठाण्यात नागरिकांना येण्याची गरज राहणार नाही. औरंगाबाद ग्रामीण अधीक्षक कार्यालयात एम-पासपोर्टसेवा 31 ऑक्‍टोबरपासून सुरु झाली आहे. त्यात अधीक्षक कार्यालयाअर्तंगत येणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये टॅबलेट पुरविण्यात आले आहे. 

पेपरलेस पडताळणी 
नागरिकांना चारित्र्य पडताळणीसाठी पोलिस ठाण्यांची उंबरे झिजवावी लागत. पोलिसांच्या वेळेनुसार व्हेरिफिकेशन केले जात होते. त्यामूळे बऱ्याच अडचणी येत असत. परंतु आता पोलिस थेट घरी येऊन चारित्र्य पडताळणी करतील. विशेषत: पडताळणी पेपरलेस असेल. या कार्यप्रणालीचा ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :