'समृद्धी'साठी आता तीस नायब तहसीलदार 

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

गावोगावी जाऊन करणार भूसंपादन : महामार्गाच्या कामाला गती देण्याचे प्रयत्न 
 

औरंगाबाद : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावनिहाय 30 नायब तहसीलदारांची नेमणूक केली आहे. भूसंपादनाबाबत येणाऱ्या समस्या दूर करून थेट जमीन खरेदी करता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, काही दिवसांतच भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचा दावाही प्रशासने केला आहे. 

राज्यातील दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या 710 किलोमीटरच्या या महामार्गासाठी जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी 1380 हेक्‍टर जमीन संपादित केली जाणार आहे; मात्र काही दिवसांपासून हे काम ढेपाळलेले आहे. ही बाब समोर आल्यानंतर संबंधित कामे तातडीने करा, अशा वरिष्ठांच्या सूचना येताच प्रशासन कामाला लागले आहे. कामाला गती यावी, यासाठी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र नायब तहसीलदाराची नियुक्‍ती केली आहे. ते गावात जाऊन उर्वरित कामांसाठी पुढाकार घेणार आहेत. तशा सूचनाच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्यात. त्याअनुषंगाने नियुक्‍त नायब तहसीलदारांना गावनिहाय जबाबदारी दिली.

यामध्ये संयुक्‍त मोजणी अहवाल वेळोवेळी अद्ययावत करून घेणे, जमिनीची प्रतवारी निश्‍चित करून अहवाल सादर करणे, संबंधित सर्व यंत्रणाचे परिपूर्ण मूल्यांकन अहवाल प्राप्त करणे, थेट खरेदीसाठी खातेदारनिहाय दरास मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, खातेदार, सहभूधारकांची संमती घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे. खरेदीसाठी आवश्‍यकता भासल्यास खातेदार यांना खरेदी कार्यालय या ठिकाणी येण्या-जाण्याची व्यवस्था करणे अशी कामे करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात 112.31 किमी लांबीचा समावेश असलेल्या या महामार्गाच्या कामासाठी प्रशासने कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. या कामी सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग, कृषी विभाग, वनविभाग महसूल, भूमी अभिलेख असे विविध खात्यांचे अधिकारी कामाला लागले आहेत. 

प्रभार अव्वल कारकुनांकडे 
समृद्धी महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी 30 हून अधिक नायब तहसीलदांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत; मात्र सध्या सणासुदीचे दिवस असताना नायब तहसीलदारांचे काम अव्वल कारकुनांनी पाहावे, असे प्रशासने म्हटले आहे. यामुळे नायब तहसीलदारांकडे अनेक कामे, समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना आता कारकुनांकडे धाव घ्यावी लागणार आहे. या फेरबदलामुळे कामकाज खोळंबणार असल्याचे म्हटले जात आहे.